देशात लवकरच स्वतःचं Digital Currency

देशात लवकरच स्वतःचं Digital Currency

The country will soon have its own Digital Currency

नवी दिल्ली, 23 जुलै: देशात लवकरच स्वतःचं डिजीटल चलन (Digital Currency) येण्याची शक्यता असून, भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) यावर काम करत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर (Deputy Governor T. Ravishankar) यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँक टप्प्याटप्प्यानं स्वतःचं डिजीटल चलन दाखल करण्याच्या धोरणावर काम करत असून, ते बाजारात आणण्याच्या प्रक्रियेत आहे. प्रायोगिक तत्वावर घाऊक (Wholesale) आणि किरकोळ (Retail) क्षेत्रात हे डिजीटल चलन दाखल करण्याची योजना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

WhatsApp Image 2021 07 24 at 11.52.49 AM

डिजीटल चलन यंत्रणा विकसित करण्यासंबंधी जगभरातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका काम करत असून, भारतातही याबाबत गांभीर्यानं काम सुरू आहे. कोणतीही सरकारी मान्यता न मिळालेल्या डिजीटल चलनांपासून ग्राहकांनी सावध राहणं आवश्यक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

डिजीटल चलनाची अंमलबजावणी लवकरच – देशात डिजीटल चलन कार्यान्वित करण्याची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता आहे. इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांप्रमाणेच भारतीय रिझर्व्ह बँकही बऱ्याच काळापासून डिजीटल चलनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत आहे, असं त्यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमात सांगितलं. अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) स्थापन केलेल्या उच्चस्तरीय मंत्री गटाने याबाबतचं धोरण आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास केला असून, देशात रिझर्व्ह बँकेला स्वतःचं डिजीटल चलन सादर करण्याची शिफारस केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रिझर्व्ह बँक स्वतःचं डिजीटल चलन टप्प्याटप्प्यानं कार्यान्वित करण्याच्या धोरणावर काम करत असून, बँकिंग प्रणाली (Banking System) आणि आर्थिक धोरणावर कोणताही परिणाम होणार नाही अशा पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाईल, असंही डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी स्पष्ट केलं.

download 1 3

देशाला स्वतःचं डिजीटल चलन आणण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणं आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यांतर्गत (RBI Act) सध्या अस्तित्वात असलेल्या तरतुदी या भौतिक चलन (Physical Currency) डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आल्या आहेत. डिजीटल चलन आणण्याकरता या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी नाणी कायदा, फेमा आणि आयटी कायद्यातही सुधारणा करण्याचीही गरज भासणार असल्याचं रविशंकर यांनी नमूद केलं.डिजीटल चलनाशी संबंधित जोखीम –

डिजीटल चलनाबरोबर काही जोखमीही येतात त्याकडे रविशंकर यांनी लक्ष वेधलं. उदाहरणार्थ, आकस्मिक अडचणीच्या वेळी बँकेतून पैसे काढताना दडपण येतं. डिजीटल चलन आल्यास त्यात अशा प्रसंगी काही जोखीम निर्माण होऊ शकते. मात्र जोखीम असली तरी संभाव्य फायद्यांचा विचार करून या डिजीटल चलनाचं काळजीपूर्वक मूल्यांकन करणं आवश्यक आहे, असं मत रविशंकर यांनी व्यक्त केलं.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत