वाहतूक निरिक्षक दाखवा, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेककडून बक्षिस मिळवा

वाहतूक निरिक्षक दाखवा, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेककडून बक्षिस मिळवा

Show traffic inspector, get reward from Raje Foundation Worker Sena

केवळ दंडात्मक कारवाई

पनवेल/प्रतिनिधी

पनवेलमधील वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या होवून बसली आहे. वाहतूकीचे नियमन करणे हे वाहतूक पोलिसांचे काम असते तर उपाययोजना काय आणि कशा कराव्यात याचे मार्गदर्शन वाहतूक निरिक्षक करत असतो, मात्र मागील दोन वर्षांपासून या वाहतूक निरिक्षकाचे दर्शन पनवेलकरांना झालेले नाही. त्यामुळे ‘वाहतूक निरिक्षक दाखवा, राजे प्रतिष्ठानकडून बक्षिस मिळवा’ असे आवाहन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या संकटात लॉकडाऊनच्या काळात पोलिसांची खरी परीक्षा पहायला मिळाली. लॉक डाऊनच्या काळात बंदोबस्ताच्या निमित्ताने अनेक महत्वाची कार्ये पोलिसांकडून करण्यात आली. पोलिसांच्या कार्य तत्परतेवरच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र पनवेल शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांचे दर्शन मात्र लॉक डाऊनच्या काळात झालेच नाही. तसेच लॉक डाऊनमध्ये शिथिलता आल्यावर सुध्दा झाले नाही. वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांना मात्र दंडात्मक कारवाईचा बडगा उचलायला सांगून वसूलीत मात्र पुढाकार घेत असल्याचेही चित्र दिसत आहे.

पनवेल बाजारपेठेमधून जाणारे रस्ते हे अरुंद आहेत, त्यामुळे एखादे मोठे वाहन आल्यास वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सम-विषम तारखेस नो पार्किंग करण्यात आले आहे. अशा नो पार्किंगमध्ये वाहन लावणार्‍यांकडून दंड आकारणे एवढेच काम वाहतूक पोलीस करीत आहेत. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी काहीच उपाययोजना करताना दिसत नाहीत. टोईंग व्हॅन घेवून एखाद्या शिकारीला निघाल्या सारखे हे निघातात सोबत या गाडीवर काम करणारी मुले असतातच. एखादे वाहन नो पार्किंगमध्ये दिसले की टोईंग व्हॅनसोबत असणारी मुले वार्‍याच्या वेगाने ती वाहने टोईंग व्हॅनवर चढवतात असे करताना त्या गाडीचे काही नुकसान होईल की नाही याकडेही ढुंकूनही पाहिले जात नाही. अनेकवेळा अनेक वाहनांचे नुकसानही झालेले आहे. वाहतूक कोंडी रोखण्या ऐवजी केवळ दंडात्मक कारवाई करण्यातच वाहतूक पोलीस धन्यता मानत आहेत. अर्थात वाहतूक निरिक्षकानेच जास्तीत जास्त कलेक्शन करा असे आदेश दिले असावेत आणि त्यामुळेच टोईंग व्हॅनवाले हे शिकार करावयाच निघतात. त्याप्रमाणेच नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी निघतात. त्यांना वाहतूक कोंडी नियमनाचे काहीच पडलेले नाही. नो पार्कींगमधील वाहने उचलायची आणि त्यांच्याकडून दंड वसूल करावयाचा एवढेच काम वाहतूक शाखा करत आहे. दोनचाकी वाहने उचलून रस्ता मोकळा केला जातो, मात्र चारचाकी वाहनांचे काय? एखादे चारचाकी वाहन नो पार्कींगमध्ये असेल तर रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. मात्र ते वाहन न उचलता केवळ त्याच्या चाकाला जामर लावला जातो.

मग तो वाहनचालक दिवसभर आला नाही तर ते वाहन तिथेच राहते आणि वाहतूक कोंडी होतच राहते. तो येवून दंड भरतो आणि मग त्याचा जामर काढण्यात येतो आणि मग ते वाहन तेथून हलवले जाते, परंतु या दरम्यान वाहतूक कोंडी होते त्याचे काहीच सोयरंसुतक वाहतूक पोलिसांना नाही. वाहतूक कोंडी पनवेल शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्यावर काही नागरिक फोन करण्याचा प्रयत्न करतात मात्र गेले अनेक वर्षे पनवेल शहर वाहतूक पोलीस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याचे समजते. केवळ जास्तीत जास्त दंड कसा गोळा करता येईल व निरिक्षक साहेब कसे खुश होतील यातच वाहतूक पोलिस धन्यता मानत असल्यामुळे पनवेलकरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल असे वाटत नाही.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत