सलाम बॉम्बे फाऊंडेशन मीडिया अकादमीत घडतोय अनुभव कदम..

सलाम बॉम्बे फाऊंडेशन मीडिया अकादमीत घडतोय अनुभव कदम..

म.न.पा शाळेत शिकणारा विद्यार्थी बनला फोटोग्राफर

समाजातील घटकांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आपल्या आजूबाजूला कार्यरत असतात पण विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रणाचे धडे देण्यासाठी आणि त्यांच्या जीवन कौशल्य विकासासाठी सलाम बॉम्बे फाऊंडेशन ही संस्था गेली १९ वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत आहे.

विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी संस्थेमार्फत वेगवेगळ्या अकादमी शाळेत राबविण्यात येतात त्यातीलच एक मीडिया अकादमी.  मीडिया अकादमी मध्ये विद्यार्थ्यांना बेसिक मीडियाच्या ओळखीपासून ते मीडियातील करिअर नेमके कोणते आहेत  याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. आजवर अनेक विद्यार्थी मीडिया अकादमीने घडवले आहेत त्यातीलच एक विलेपार्ले येथील दीक्षित रोड म.न.पा शाळेत शिकणारा अनुभव सुरेंद्र कदम.

१७ वर्षांचा अनुभव हा लहानपणापासून सर्जनशीलता जपणारा मुलगा आहे. मीडिया अकादमी मध्ये त्याने इयत्ता ७ मध्ये असताना प्रवेश केला आणि इयत्ता  ९ वी पर्यंतचा मीडिया अकादमीचा तीन वर्षांचा मोफत कोर्स पूर्ण केला होता. त्या तीन वर्षात अनुभवने मीडिया म्हणजे काय, बातमी कशी लिहितात, संवाद कसा साधायचा असतो , फोटोग्राफी म्हणजे काय व ती कशी करावी याबद्दलचे प्रशिक्षण घेतले होते.  कोर्सपूर्ण झाल्यावर त्याला आवड असणाऱ्या फोटोग्राफी करिअर मध्ये त्याने वाटचाल करणे सुरू केले. गेल्या दोन वर्षात अनुभवने फोटोग्राफी मध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. श्री क्रिएशन नावाच्या स्टुडिओ सोबत अनुभव जोडला गेला असून वेगवेगळे सोहळे, लग्न समारंभाचे , कार्यक्रमाचे ऑर्डर्स तो घेतो आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर खर्च करण्यासाठी आईला मदत करतो. कोरोनाच्या काळात देखील त्याने चार लग्न समारंभाच्या ऑर्डर्स केल्या आहेत आणि त्यातून प्रत्येक ऑर्डरमागे पाच हजार कमावले आहेत. याचबरोबर विविध फोटोग्राफी स्पर्धांमध्ये देखील तो सहभागी होत असतो.  सलाम बॉम्बे फाऊंडेशन आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत देखील त्याला चांदीचे नाणे मिळाले आहे तसेच फोर्ट गणेशोत्सव  मंडळाकडून आयोजित केलेल्या व्हिडिओग्राफी स्पर्धेत देखील अनुभवने क्रमांक पटकावला असून त्यात  अनुभवला रोख पाच हजार रुपये आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

अनुभवला भविष्यात फोटोग्राफी मध्येच करिअर करायचे आहे. आईला व लहान भावंडांना सुखात ठेवण्यासाठी त्याला खूप मेहनत करून पैसे मिळवायचे आहेत असं तो नेहमी म्हणतो. दीक्षित रोड म.न. पा शाळेच्या मुख्याध्यापिका नीता गावित मॅडम देखील अनुभवच्या फोटोग्राफी कौशल्याचे कौतुक करत असतात आणि शाळेतील कार्यक्रमाचे फोटोशूट करण्यासाठी त्याला संधी देत असतात.  अश्याप्रकारे अनेक स्वप्न उराशी बाळगत  अनुभव कदम हा सध्या घडत आहे. अनुभवला त्याच्या उज्जवल भविष्यासाठी सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि मीडिया अकादमीकडून खूप खूप शुभेच्छा.

©️शुभम पेडामकर

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत