मोडून पडला संसार तरी……

मोडून पडला संसार तरी……

Although the world is broken ......

डॉ. प्रभाकर गावंड- महाड

यावर्षी सावित्री पुन्हा एकदा कोपली.
महाबळेश्वरच्या पवित्र तीर्थक्षेत्रातून उगम पावलेली सावित्री नदी पोलादपूर आणि महाड या दोन तालुक्यातून पुढे बाणकोटच्या खाडीत विसर्जित होते. येताना ती अनेक गावांना स्पर्श करून येते. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांतून अवखळ पण खळखळत वाहणारी सावित्री महाड शहरानजीक प्रवेश करताना काहीशी शांत होते. एकेकाळी सावित्री नदीतून मोठ्या प्रमाणात मधाची वाहतूक केली जाई. त्यामुळे तिला’रिव्हर आॅफ हनी’ असे म्हटले जाई. महाड आणि दासगाव ही तिच्या किना-यावरील दोन प्राचीन बंदरं. येथून देशविदेशात व्यापार चालत असे.
पोलादपूर आणि महाड ही दोन शहरं तिच्या काठावर वसलेली. दरवर्षी पावसाळ्यात ती आपले शुभ्र धवल नितळ पाणी आपल्या उदरातून समुद्रात घेऊन जाते. तिच्या पाण्यातून किना-यावर ची सर्वच गावं आपली तहान भागवतात. किंबहुना शेती वा औद्योगिक वापरासाठी देखील तिचा उपयोग करून घेतात. एरवी या दोन्ही तालुक्यांसाठी सावित्री नदी ही जणू जीवनदायिनीच असते. परंतु पावसाळ्यातील दोन चार दिवस ती रुद्र रूप धारण करून अक्राळविक्राळ वाहू लागते तेव्हा तिच्या काठावरील सर्वंच गावांची व तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडून जाते. त्यातल्या त्यात महाडवासीय नागरिक हे सावित्री च्या महापुराला तसे सरावलेलेच. पण एका दिवसाच्या पुराने महाडकरांची पुरती दैना उडते.

0.87686200 1566558824 img 1483 min

काल २२ जुलै रोजी पुन्हा एकदा सावित्रीने आपले रौद्र रूप दाखविले. २००५ च्या २५ जुलैला आलेला महापूर व त्याने महाडची केलेली वाताहत लोकांच्या अजूनही स्मरणात आहे. दरवर्षी सावित्री ला येणारे पूर महाड शहराच्या सखल भागात नित्याचेच असतात. एखाद्या वर्षी पूर आला नाही तर महाडकरांना रुखरुख लागते. पुराची चाहूल लागताच महाडकर किना-यावर त्याचा आनंद घेण्यासाठी धावतात. दादली पूल, भोईघाट, स्मशानभूमी, गांधारी पूल ही पूर बघण्याची आवडती ठिकाणं. भोईघाटावरील बुडालेल्या पाय-यांवरून पुढचे आडाखे बांधत ज्याच्या त्याच्या तोंडी ‘किती पाय-या राहिल्यात?’ हा प्रश्न असतो. सुकट गल्ली, दस्तुरी नाका या सखल भागात पूर हा तसा नित्याचाच. महाडकरांनी या पुरासाठी “उथव” हा विशेष शब्द प्रचलित केला. २००५ नंतर २०९९ च्या आॅगस्ट महिन्यात ६ तारखेला सावित्रीला असाच अनपेक्षित महापूर आला होता. महाडच्या स्मशानभूमी परिसरातून नदीचा प्रवाह अचानक शहरात शिरला आणि नागरिकांची एकच धांदल उडाली. सायंकाळच्या वेळी बरेचसे नागरिक पुराची मजा घेण्यासाठी बाहेर पडले असताना वेगाने शिरलेल्या पाण्याने संपूर्ण शहराला कवेत घेतलं. घरातील सामानसुमान सुरक्षित स्थळी हलविण्यास देखील संधी मिळाली नाही. शेकडो चारचाकी, तीनचाकी व दुचाकी वाहने पाहता पाहता पाण्यात अडकली. पूर ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरात चिखल आणि घाणीचं साम्राज्य होतं.

following district walks sangli floods damaged house 2a836d36 c274 11e9 9ed0 dd7a6b36c3ad


आज पुन्हा एकदा तोच अनुभव महाडकरांना आला. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने महाडकर तसे सावध होते. आदल्या दिवशी घरातील सामानाची व गाड्यांची सुरक्षित स्थळी हलवाहलव केली होती. सखल भागात राहणारे नागरिक आधीच दक्ष असतात. पण इतर भागातील नागरिक परिस्थितीचा अंदाज घेत हालचाली करतात. रात्री सखल भागात पाणी शिरलेले होते. पण सकाळी पहाटे पहाटे इतर भागात देखील वेगाने पाणी चढू लागले. २०१९ प्रमाणे स्मशानभूमी परिसरातून नदीचा प्रवाह शहरात शिरला आणि प्रचंड वेगाने सर्व महाड शहर हा हा म्हणता जलमय झाले. अनेक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत संपूर्ण शहराला महापुराचा विळखा पडला होता. क्षणाक्षणाला पाणी वाढत होते. दुपारनंतर पाण्याचा पातळी एक फुटाने कमी झाली असेल नसेल तोच सायंकाळी ४ नंतर पुन्हा पाणी वाढू लागले. पाणी वाढण्याचा हा वेग इतका प्रचंड होता की, फुटाफुटाने पाणी वाढू लागले. महाडच्या सखल भागात हे पाणी १५ ते २० फुटांपर्यंत तर काही भागात ते १० ते १५ फुटांपर्यंत होते. आजवर शहरातले जे भाग सुरक्षित समजले जात होते त्या भागात देखील ५ ते ७ फूट पाणी भरले होते. शहराचा असा एकही भाग या महापुराने सोडला नाही. अवघं महाड जलमय झालं होतं. रात्री अंधार पडू लागल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजीची छटा दिसू लागली. इमारतींमध्ये राहणारे नागरिक वरच्या मजल्यावर आश्रय घेत होते. मात्र एकमजली, दुमजली घरातील लोक जीवाच्या आकांताने ओरडत होते. बचाव पथकाकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात होते. मात्र इंटरनेट व मोबाईल नेटवर्क बंद असल्याने संपर्क यंत्रणा ठप्प झाली होती. रात्री १२ वाजेपर्यंत पाणी वाढत होतं. आतापर्यंत सावित्रीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडले होते. तोपर्यंत संपूर्ण शहराची वाताहत झाली होती. १२ नंतर हळूहळू पाणी ओसरू लागले. सकाळी ६ वाजेपर्यंत काही भागातील पाणी पूर्णतः ओसरले. मात्र सखल भागात अजूनही पाणी भरलेले होते. सकाळी लोकांनी आपापली वाहने पाहण्यासाठी गर्दी केली. शासकीय निवासस्थान परिसर, चवदार तळे, काकरतळे, राष्ट्रीय महामार्ग परिसर इ. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी बहुतांशी वाहने ठेवण्यात आली होती. मात्र पुराच्या पाण्याने याही भागात दुचाकी व चारचाकी वाहनांची झालेली अवस्था पाहून प्रत्येक मालकाच्या चेह-यावर दु:खाची छाया दिसत होती. तर बाजारपेठ परिसरातील दृष्य हे मन हेलावून टाकणारे होते. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला उध्वस्त झालेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होते. सावित्रीच्या पुराने महाडकरांना दरवर्षी अशा संकटांचा सामना करावा लागतो. मात्र तरीही महाडकरांनी कधीही हार मानली नाही. उलट ते पुन्हा जिद्दीने उभे राहून कोणाच्याही मदतीची अपेक्षा करीत नाहीत.
त्यांचं फक्त एवढंच म्हणणं असतं ते म्हणजे ” मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा”

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत