‘स्वायत्त महाविद्यालयांनी नवे बदल स्वीकारण्याची गरज! -डॉ विजय जोशी

‘स्वायत्त महाविद्यालयांनी  नवे बदल स्वीकारण्याची गरज! -डॉ विजय जोशी

'Autonomous colleges need to accept new changes! -Dr. Vijay Joshi

नवी मुंबई- स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिप्रेक्ष्यात नवे बदल स्वीकारण्याची नितांत गरज असल्याचे मत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे प्रमुख सल्लागार व माजी प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या महाविद्यालयीन स्तरावरील अंमलबजावणीवर विचार मंथन करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला- वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय व रामानंद आर्य स्वायत्त महाविद्यालय, भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणे राबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना” या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत (एफडीपी) बीजभाषण करताना ते बोलत होते.
यावेळी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक , प्राचार्य डॉ. अजय भामरे , डॉ.प्रमोद पाबरेकर , डॉ. माधुरी पेजावर ,डॉ. प्रज्ञा राजेबहादूर , डॉ. पी. एन.माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विजय जोशी म्हणाले”,मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे केवळ कारकून निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था आपण आतापर्यंत राबवली, ज्यामध्ये संपूर्णपणे भारतीयत्वाचा अभाव होता. परकीय आक्रमकांनी येथील शिक्षण पद्धती मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र पुन्हा एकदा भारतीय मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी व शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले. ६६ पानांच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुदयामध्ये २०० पेक्षा जास्त वेळेला शिक्षक हा शब्द आला असून शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रगतीशील शिक्षक व नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवल्या गेलेल्या रणजीत डिसले गुरुजी यांचे उदाहरण देऊन त्यांनी शिक्षकांनी नवनवे प्रयोग केले पाहिजेत असे नमूद केले.”

WhatsApp Image 2021 07 02 at 12.47.24 PM 1


“विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी मूलगामी बदल नवीन शैक्षणिक धोरण सुचवते. निर्धारित अभ्यासक्रमांची पुनर्मांडणी करून विद्यार्थी त्यातून नक्की काय शिकला हे अधोरेखित करणारे नवे धोरण असले पाहिजे.भारतात असलेल्या ४० हजार पेक्षा अधिक चांगल्या महाविद्यालयातून केवळ ९०० महाविद्यालयांना स्वायत्तता दर्जा मिळाला आहे त्या मानाने ही संख्या फारच थोडी आहे.स्वायत्त महाविद्यालयांनी सृजनात्मक कार्यपद्धती अवलंबून नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणण्यासाठी आदर्श कार्य करावे असे डॉ. विजय जोशी यांनी आवाहन केले. आपल्या परिसरात असलेले उद्योगधंदे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आपण निर्माण करावयास हवे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची भूमिका विशद करताना अंतर्गत गुणवत्ता संवर्धन कक्षाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा राजेबहादुर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रख्यात ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस यांच्या विचारांना उजाळा देत शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी नवनवीन सृजनात्मक कार्यात आपले योगदान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालयातील दोनशेहून अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुजा रॉय अब्राहम यांनी केले.

शुभम पेडामकर

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत