श्रीलंका दौरा; धवन, हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत, सर्व सामन्यांचे कोलंबोत आयोजन

श्रीलंका दौरा; धवन, हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत, सर्व सामन्यांचे कोलंबोत आयोजन

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेला श्रेयस अय्यर हा श्रीलंका दौऱ्याआधी तंदुरुस्त होईल का हे निश्चित नाही.

नवी दिल्ली : भारतीय संघ आगामी जुलै महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यात तीन टी-२० आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळली जाईल. जखमी श्रेयस अय्यर मर्यादित षटकांच्या या दौऱ्याआधी फिट न झाल्यास अनुभवी सलामीवीर शिखर धवन तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यापैकी एकाची कर्णधारपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. याच काळात विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू इंग्लंड दौऱ्यात व्यस्त राहणार आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेला श्रेयस अय्यर हा श्रीलंका दौऱ्याआधी तंदुरुस्त होईल का हे निश्चित नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण होण्यास किमान चार महिन्यांचा कालावधी जातो. जर श्रेयस उपलब्ध असेल तर तोच नेतृत्व करण्यासाठी प्रथम पसंती असेल. त्याचप्रमाणे, शिखर धवन आणि हार्दिक पांड्या हेदेखील शर्यतीत आहेत.शिखरने आयपीएलच्या दोन पर्वांत प्रभावी कामगिरी केली. अनुभवी या नात्याने नेतृत्वाच्या शर्यतीत सर्वांत पुढे आहे. हार्दिकबाबत बोलाल तर ‘मॅचविनर’या नात्याने त्याचा दावादेखील भक्कम असेल. नेतृत्वाची अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यांनतर तुमची कामगिरी कशी होईल, हे सांगता येत नाही.’

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सर्व झटपट सामने कोलंबोतील के. आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळविण्याची योजना श्रीलंका क्रिकेटने आखली आहे. एसएलसीचे प्रशासकीय समिती प्रमुख अर्जुन डिसिल्व्हा म्हणाले, ‘संपूर्ण मालिका एकाच ठिकाणी आयोजित करण्याची योजना आहे.’

वृत्तानुसार भारतीय संघ ५ जुलै रोजी लंकेत दाखल होईल. सर्व खेळाडू आठवडाभर क्वॉरंटाईन राहतील. हा कालावधी संपल्यानंतर १३ जुलैपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २२ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. त्यावेळी परिस्थिती कशी असेल यावर सामन्यांचे आयोजन विसंबून असल्याचे डिसिल्व्हा म्हणाले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत