लसीकरण गरजेचे

लसीकरण गरजेचे

करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आपण एकत्रितपणे लढत आहोत

करोना विषाणूचे गुणधर्म आणि हवेतून होणारा प्रसार यांमुळे या विषाणूचा पूर्णत: नायनाट करणे सध्या तरी शक्य वाटत नाही. म्हणूनच वैयक्तिक सुरक्षा, प्रसारासाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करणे यासोबतच लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. संसर्गजन्य आजार म्हटले की, आजारास कारणीभूत विषाणू किंवा जिवाणू, बाधित होण्याची शक्यता वर्तविणारे घटक आणि आजार प्रसारासाठी पूरक वातावरण या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणजेच प्रसार रोखण्यासाठीसुद्धा कारणीभूत जिवाणू किंवा विषाणूंचे निर्मूलन, बाधित होऊ  नये म्हणून घ्यावयाची वैयक्तिक सुरक्षा आणि रोगप्रसारासाठी आजूबाजूचे वातावरण पूरक राहणार नाही यासाठी घ्यावयाची काळजी या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आपण एकत्रितपणे लढत आहोत. सार्वजनिक आरोग्याच्या इतिहासात एखाद्या नव्या आजाराची केवळ एक वर्षांत लस उपलब्ध होणारा करोना हा पहिलाच आजार आहे. करोना संक्रमण टाळण्यासाठी सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड दोन लशी उपलब्ध आहेत. मोठय़ा प्रमाणात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत १७ कोटींपेक्षा अधिक जणांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रा सहा आठवडय़ांच्या अंतराने घ्यायची आहे तर कोव्हॅक्सिन लशीच्या दोन मात्रा चार ते सहा आठवडय़ांच्या अंतराने घ्यायच्या आहेत.

करोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची कमीत कमी वेळेत लसीकरण होणे गरजेचे आहे. लस वितरण करण्याची सक्षम यंत्रणा आणि प्रत्यक्ष लसीकरण व्यवस्था यामध्ये आपण स्वयंपूर्ण असलो तरी लशीच्या पुरेशा मात्रांची उपलब्धता हा सध्या कळीचा मुद्दा आहे. सरकारी स्तरावर यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. लस घेण्यासाठी कोविन संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी, निर्धारित वेळ घेणे बंधकारक आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रिया पार पाडून लस घेऊन वैयक्तिक सुरक्षा प्राप्त करून घेणे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे.

लस घेणे आवश्यकच

दुसरी लाट काही ठिकाणी ओसरत असल्याने आता लशीची काय आवश्यकता, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. परंतु दुसरी लाट ओसरली तरी पुन्हा तिसऱ्या लाटेचे संकेतही तज्ज्ञांनी दिले आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना अधिक धोका असल्याचा इशारा जरी दिलेला असला तरी अतिजोखमीच्या गटातील ६० वर्षांवरील, मधुमेह, उच्च रक्तदाब इतर दीर्घकालीन आजारांचे रुग्ण इत्यादींनी लशीची सुरक्षितता न घेतल्यास तीव्रतेने बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली किंवा संसर्गाचा प्रसार आटोक्यात आला तरी तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी लस घेणे अत्यावश्यक आहे.

लसीकरण केंद्रांवरही प्रतिबंधात्मक उपायांचे पालन गरेजेचे

लस मात्राच्या मर्यादित उपलब्धतेमुळे सध्या लसीकरण केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जात नाही. करोनाबाधित आणि लक्षणेविरहित लोकांची वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणासाठी होणारी गर्दीच करोना संक्रमणासाठी कारणीभूत होणार नाही ना अशी चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. तेव्हा लसीकरणसाठी पूर्वनोंदणी आणि निर्धारित वेळ घेऊनच लसीकरणासाठी जाणे हा योग्य मार्ग आहे.

लशीचे फायदे

आजच्या घडीला लसीकरणामुळे करोनाची बाधा होण्याची शक्यता किती कमी होईल, हे सांगता येणार नाही. परंतु बाधा झालीच तर तीव्रता कमी असेल आणि मृत्यूचा धोका नगण्य असेल, हे लसीकरणाचे फायदे निर्विवाद सिद्ध झाले आहेत. तेव्हा करोना होऊन गेला आहे किंवा प्रतिकारशक्ती आहे या गैरसमजात न राहता लस घेऊन सुरक्षित होणे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन?

दोन्ही लशींपैकी कोणती लस परिणामकारक आहे असा संभ्रम अनेकांमध्ये अजूनही आहे. दोन वेगवेगळ्या पद्धतीने निर्मिती केलेल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करण्याच्या तांत्रिक फरकामुळे दोन्ही लशींमध्ये थोडाफार फरक असणे स्वाभाविक आहे. परंतु वैयक्तिक पातळीवर दोन्ही लशी सुरक्षितता देण्यास सक्षम असून तांत्रिक बाबींचा विचार खोलात करणे सर्वसामान्यांसाठी गरजेचे नाही. त्यामुळे हीच लस हवी असा आग्रह पूर्णपणे चुकीचा आहे. करोना प्रतिबंधासाठी लसीकरण म्हणजे १०० टक्के रामबाण उपाय असा गैरसमज करून घेऊ नये. लसीकरणाला वैयक्तिक सुरक्षेच्या इतर गोष्टी जसे मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर नियमांचे पालन याची साथ मिळाल्यास एकत्रित केलेल्या सर्व उपाययोजना आपणांस खात्रीशीरपणे करोनापासून दूर ठेवू शकतात. म्हणजेच लसीकरणाच्या नावाखाली इतर प्रतिबंध उपायांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत