राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात

सिंधुदुर्ग :-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. ती इतकी वाढली आहे, की नुकत्याच संपलेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रुग्णवाढीत राज्यात टॉपवर आला आहे. पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा राज्यात प्रथम क्रमांकाचा असून तो 21.36 टक्के इतका आहे. एका बाजूने राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हा उद्रेक झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारीही 523 इतके रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात दहाजणांचा मृत्यू झाला आहे.राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवार, 27 मे रोजी मागील आठवड्याचा कोरोनासंबंधीचा राज्याचा अहवाल जाहीर केला आहे.

21 ते 26 मेपर्यंतच्या सात दिवसांत राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर सर्वांत जास्त म्हणजे 2.01 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे राज्याचा सरासरी रुग्णवाढीचा दर 0.47 टक्के आहे. यावरुनच सिंधुदुर्गची काय स्थिती आहे हे लक्षात येते. अर्थातच रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर असून या जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर 1.55 टक्के इतका राहिला आहे. तिसर्‍या क्रमांकावर यापूर्वीच्या आठवड्यानुसारच कोल्हापूर जिल्हा असून या जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर 1.51 टक्के इतका आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणचा रुग्णवाढीचा दर इतर भागांच्या तुलनेत अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात सर्वात कमी रुग्णवाढीचा दर नांदेड जिल्ह्याचा राहिला असून तो केवळ 0.13 टक्के इतका आहे. मुंबई 0.18 टक्के, ठाणे 0.17 टक्के, रायगड 0.49 टक्के, पालघर 0.49 टक्के इतका रुग्णवाढीचा दर गेल्या आठवड्यात होता.साप्ताहिक पॉझिटिव्हीटीची टक्केवारीदेखील सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केली असून त्यामध्येही सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांत वर आहे. गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 31.36 टक्के असून सातारा जिल्ह्याचा दुसर्‍या क्रमांकाने 20.02 टक्के इतका आहे. त्याखालोखाल तिसर्‍या क्रमांकाला रत्नागिरी जिल्हा असून त्याचा जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी 19.22 टक्के इतकी आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हीटी जळगाव जिल्ह्याची असून ती 3.41 टक्के इतकी आहे.त्यामुळे साप्ताहिक पॉझिटिव्हीटी असलेले आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावे, असे असलेल्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट मात्र 10.46 टक्के इतका राहिला आहे.

45 वर्षे वयावरील लोकांच्या लसीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्गची लसीकरणाची टक्केवारी 47.13 टक्के इतकी झाली आहे. जिल्ह्यात 45 वर्षे वयापेक्षा अधिक असलेले नागरिक 2 लाख 48 हजार 326 इतके असून त्यातील 1 लाख 17 हजार 44 इतक्या लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यात लसीकरणात सर्वात आघाडीवर कोल्हापूर जिल्हा असून 45 वर्षे वयावरील 63.79 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात राज्यात सर्वांत पिछाडीवर पालघर जिल्हा असून या जिल्ह्यातील 18.51 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे.

मृत्यू दरातही सिंधुदुर्गाची स्थिती गंभीर

सध्यातरी एखाद्या दिवशी 16, कधी 13, कधी 10 असे दररोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृत्यूदरामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सवार्ंत टॉपवर होता. मे महिन्यात मृत्यूची संख्या कमी होईल, असे अपेक्षित होते. परंतु, दररोज मृत्यूचा आकडा 8 च्या पुढे आहे. विशेष म्हणजे, राजकीय, सामाजिक, तसेच प्रशासकीय क्षेत्रात काम करणारे आणि प्रसिद्ध असणार्‍या व्यक्‍तींचेही कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. मृत्यूंचे आकडे ऐकून सिंधुदुर्गवासीयांची चिंता वाढली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत