योनीमार्ग व गर्भपिशवीला जोडणा-या ग्रीवा कर्करोगाची लक्षणे व उपाय जाणून घ्या डॉ. प्राजक्ता बरडेंकडून!

योनीमार्ग व गर्भपिशवीला जोडणा-या ग्रीवा कर्करोगाची लक्षणे व उपाय जाणून घ्या डॉ. प्राजक्ता बरडेंकडून!

सामान्यत: जगातील स्त्रियांमध्ये आढळणारा ग्रीवेचा कर्करोग हा चवथ्या क्रमांकावर येतो. २०१८ च्या गणनेनुसार संपूर्ण जगात पाच लाख स्त्रियांमध्ये या कर्करोगाचे निदान झाले व एकूण रुग्णांपैकी तीन लाख रुग्ण दगावले. भारतात दरवर्षी ग्रीवेच्या कर्करोगाचे जवळपास १ लाख नवीन रुग्ण दिसून येतात आणि एकूण रुग्णांपैकी साठ हजार रुग्ण यामुळे दगावतात. म्हणूनच ग्रीवेचा कर्करोग भारतात स्त्रियांमधील कर्करोगात दुसरे स्थान पटकावून आहे.

डॉ. प्राजक्ता बरडे, स्त्री रोग तज्ज्ञ, नागपूर

ग्रीवा हा गर्भपिशवी व योनीमार्ग यांना जोडणारा अवयव आहे. ग्रीवेचा कर्करोग स्थानिक पेशींच्या असामान्य वाढीमुळे दोन प्रकारात मोडला जातो. अॅडिनोकारसीनोमा व स्क्वामस सेल कारसीनोमा. दोन्हीपैकी स्क्वामस सेल प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण जगामध्ये अधिक आहे. ग्रीवेचा कर्करोग प्राधान्याने पन्नाशीतील महिलांमध्ये आढळून यायचा, पण मागील दशकापासून तरुण महिलांमध्येही या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. कमी वयात होणाऱ्या कर्करोगाच्या कारणांमध्ये लैंगिक स्वैराचार हे एक महत्त्वाचे कारण समजले जाते. ग्रीवेच्या कर्करोगाला अनेक घटक कारणीभूत ठरतात.

 1. जोखीम वाढवणारे घटक
 2. लहानपणापासून शारीरिक संबंध
 3. कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा अस्वीकार
 4. अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध
 5. वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात
 6. गर्भनिरोधक गोळ्यांचे अधिक काळपर्यंत सेवन
 7. धूम्रपान
 8. रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
 9. एचआयव्ही अथवा लैंगिक संबंधामुळे पसरणारे इतर रोग
 10. ह्युमन पॅपिलोया विषाणूचा

ह्युमन पॅपिलोया वायरस (एचपीव्ही) चा संसर्ग हा ग्रीवेच्या कर्करोगाचे महत्त्वाचे कारण आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ग्रीवेच्या पेशींमध्ये मध्ये बदल घडण्यास सुरुवात होते. बदल घडायला लागल्यापासून असामान्य वाढ होईपर्यंत १० वर्षांपेक्षा जास्त काळ जातो. सुरुवातीच्या काळातील आढळणारी सामान्य लक्षणे दुर्लक्षित झाल्यामुळे या कर्करोगाचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते.

या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे पुढीप्रमाणे असतात-

 1. शरीर संबंधांच्या वेळी वेदना होतात
 2. योनीमधून दुर्गंधीयुक्त स्राव
 3. मासिक पाळीमध्ये खूप रक्तस्राव

उशिरा दिसून येणाऱ्या लक्षणांमध्ये शरीर संबंधानंतर असामान्य रक्तस्राव होणे हे प्रमुख कारण होय. शिवाय भूक न लागणे, वजन कमी होणे, पायावर सूज येणे, पोटावर सूज असणे, लघवी किंवा शौचावाटे रक्तस्राव होणे इत्यादी लक्षणेसुद्धा उशिरा आढळतात. ग्रीवेच्या कर्करोगाचे निदान प्राथिमक अवस्थेत होणे सहज शक्य असते. लवकर निदान होण्याकरिता सर्व महिलांनी वयाच्या ३५ व्या वर्षापासून आपल्या स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अधिक जोखमीची लैंगिक वागणूक असणाऱ्या व्यक्तींनी न चुकता वर्षातून कमीत कमी एकदा तरी स्त्री रोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

-या कर्करोगाचे निदान होण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात.

 1. पॅप स्मिअर- या चाचणीत ग्रीवेच्या पेशीमधील बदल शोधले जातात. ही चाचणी करताना गर्भ पिशवीच्या मुखावरील स्राव काढून पॅथॉलॉजी तज्ज्ञाकडे पाठविला जातो. पॅप स्मिअर चाचणी प्रत्येक महिलेने वयाच्या ३५ व्या वर्षापासून दर तीन वर्षांनी तर अधिक जोखमीची वागणूक असणाऱ्या महिलांनी दर वर्षी करावी.
 2. एचपीव्ही डीएनए- ह्युमन पॅपिलोमा विषाणूचा संसर्ग जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते.
 3. कॉल्पोस्कोपी- यात दुर्बिणद्वारे ग्रीवा व योनीमार्गाचा सखोल अभ्यास करून सामान्य न दिसणाऱ्या भागातील बायप्सी घेतली जाते.
 4. एमआरआय- ही तपासणी कर्करोगाच्या नंतरच्या स्थितीत शरीरातील प्रसार जाणून घेण्यासाठी करतात.

या कर्करोगात सुरुवातीच्या काळात शस्त्रिक्रियेद्वारे ९० टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. पण नंतरच्या टप्प्यात रेडिओथेरपी उपचार पद्धतीचा उपयोग केला जातो. हा कर्करोग नियंत्रणासाठी ह्युमन पॅपिलोमा लसीकरण हा एक मोठा टप्पा ठरू शकतो. साधारणत: वयाच्या ११ ते १२ व्या वर्षांपासू ही लस घेणे फायद्याचे ठरते. या लसीच्या तीन मात्र दिल्या जातात.

author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत