येई वो विठ्ठले माझे माऊलिये

येई वो विठ्ठले माझे माऊलिये

Yei wo vitthale majhe mauliye

विष्णुदास नामा या कवींनी लिहिलेला अभंग आरती स्वरूपात गेली चारशे-पाचशे वर्षे अखंड गायला जात आहे. तेही साधी सुधी नाही, तर अगदी टीपेच्या सुरात. आजच्या भाषेत सांगायचे तर वरचा सा मिळेपर्यंत, या आरतीचा सूर मनोभावे आळवला जातो. गणेशोत्सवात ही आरती सामुहिक रित्या म्हणताना जो आर्त भाव दाटून येतो, की पांडुरंगाला ओ द्यावीच लागते आणि तो या ना त्या रूपात भक्तीभेटीला येतो.

येई वो विठ्ठले माझे माऊलिये,
निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहे।
आलिया गेलिया हाती धाडी निरोप,
पंढरपुरी आहे, माझा मायबाप।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला,
गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला।
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी,
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी

bf6e921ee587c970bd2f367597bbe0e9

या आरतीत विष्णुदास नामा म्हणतात, हे विठाई माऊली, मी कपाळावर हात धरून तुझी आतुरतेने वाट पाहात आहे. कोणी येणारा, जाणारा दिसला की त्याच्याबरोबर मी निरोप पाठवत आहे. माझा मायबाप पंढरपुरात राहतो. माझी आर्त सुरात मारलेली हाक ऐकून जणू विठूराया येत आहे. गरुडावर बसून माझा कैवारी माझ्याकडे येत आहे, याचा कोण एक आनंद! विठोबाचे राज्य म्हणजे आम्हाला रोजची दिवाळी आहे. अशा या माझ्या जिवाभावाच्या विठ्ठलाला मी प्रेमाने ओवाळतो आहे. हा अभंग रचणारे कवी विष्णुदास नामा हे संत नामदेव नव्हे. तर विष्णुदास नामा हे संत नामदेवांनंतर होऊन गेलेले कवी आहेत.  त्यांच्या आणखीही अनेक रचना प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्या नावाचा आठव झाल्यावर रचना आठवावी, ती या आरतीचीच!

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत