म दो हमारे दो च्या जमान्यात आईवडिल घराबाहेर !

WhatsApp Image 2021 10 24 at 5.10.28 PM 1
    " हम दो हमारे दो च्या जमान्यात आपले आईवडील घरातून हद्दपार होत आहेत.ही फार मोठी शोकांतिका आहे.नव्या पिढीने प्रचंड मेहनत करून यश मिळविलेले आहे.या यशात आईवडिलांचे योगदान मोठे आहे. हे लक्षात ठेवून आईवडिलांचे विस्मरण होऊ देऊ नका. वृद्धाश्रम तुडुंब भरत आहेत. स्वतःच्या घरात वृद्ध आईवडिलांना स्थान नाही. ",अशी खंत ज्येष्ठ वकील शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली. शारदा प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या लेखक जी.ए.पाटील यांच्या ' फाटक्या कपड्यातील बाप'( आत्मकथन) , मु.पो.कचराकुंडी( कथासंग्रह) या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त दंडाधिकारी डी.जे.कनोजिया , के.एम.वकील ,लेखक जी. ए.पाटील, प्रकाशक संतोष राणे,कादंबरीकार ज्येष्ठ लेखक मोहन पवार, के.एम. वकील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
    सध्या आईवडिलांना न सांभाळणारी पिढी दिसत असून वृद्धाश्रमांची संख्या वाढत असल्याचे सांगून शिवाजी पाटील पुढे म्हणाले," हम दो हमारे दो च्या जमान्यात आईवडील मात्र वजा झालेले आहेत.आईवडिलांना दैवत मानणारी पिढी नामशेष होत असून प्रत्येकजण वृद्ध होणार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जी.ए. पाटील यांचे लेखन प्रवाही असून जुन्या काळातील अनेक संदर्भ त्यांच्या लेखनात आढळतात.लेखकाने अनेक अडचणींवर मात करून उच्चशिक्षण प्राप्त केले. शिक्षणातुन स्वतःची आणि समाजाची प्रगती केली. इतकेच काय पण स्वतःच्या अनुभवावर दोन पुस्तके लिहिली. या आत्मचरित्रामध्ये वडिलांचे कणखर व्यक्तिमत्त्व त्यांनी अतिशय उत्कटतेने रंगविलेले आहे."
   मनोगत व्यक्त करताना लेखक जी. ए.पाटील म्हणाले ,"माझे बालपण खेड्यात गेले. त्या मातीचे संस्कार घेऊन मी मोठा झालो.माझ्या वडिलांच्या अंगावर नेहमी फाटके कपडे असायचे. प्रचंड गरिबी असूनही माझ्या आईवडिलांनी हिंमत हारली नाही. परिस्थितीशी ते दोन हात करत राहिले. जो लढतो तो जिंकतो हा आत्मविश्वास मला त्यांच्यामुळे मिळाला.म्हणूनच मी शेतमजूर ते मॅजिस्ट्रेट होऊ शकलो. नोकरी लागल्यानंतर आईवडिलांना मी अत्यंत सुखात ठेऊ शकलो याचा मला जास्त आनंद आहे".
   प्रकाशक प्रा. संतोष राणे म्हणाले", मराठी साहित्यात आत्मकथनाची परंपरा मोठी आहे. नरेंद जाधव यांचे 'आमचा बाप अन आम्ही ' पासून 'फाटक्या कपड्यातील बाप' पर्यन्त आत्मकथनाची परंपरा समृद्ध आहे. लेखक जी. ए.पाटील यांचे लेखन प्रवाही असून त्यांच्या आयुष्यातील संघर्ष प्रत्येकाला प्रेरणा देईल याची खात्री असल्यामुळे हे पुस्तक प्रकाशीत करण्याचे ठरविले. त्यांची दोन्ही पुस्तके इंग्रजीत प्रकाशित करणार असून ती सातासमुद्रापार असलेल्या वाचकांना उपलब्ध होतील. शारदा प्रकाशन सकस साहित्य लिहिणाऱ्या कवी - लेखकांच्या शोधात असून नवेनवे प्रयोग करीत आहे. या लेखन यात्रेत सर्वानी सामील व्हावे असे आवाहनही प्रकाशक संतोष राणे यांनी यावेळी केले.
     यावेळी ज्येष्ठ लेखक कादंबरीकार मोहन पवार , डी.के. कनोजिया, पुरुषोत्तम आचार्य , के.एम. वकील यांचीही भाषणे झाली. पंकज चव्हाण यांनी शैलीदार सूत्रसंचालन केले.
 • शुभम पेडामकर