मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत उद्या महत्वाची बैठक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत उद्या महत्वाची बैठक

राज्यातील मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर हा मुद्दा सध्या जोरदार गाजत आहे. याचपार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये उद्या, सोमवार, 24 मे रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर हा मुद्दा सध्या जोरदार गाजत आहे. याचपार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये उद्या, सोमवार, 24 मे रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी मंडळाच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीला कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी हजेरी लावतील.

या बैठकीनंतर संभाजीराजे राज्याच्या दौऱ्याला सुरवात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका 27 मे रोजी जाहीर  करणार असल्याचे संभाजीराजे यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकलत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार वेळा वेळ मागूनही त्यांनी ती दिली नसल्याचे त्यांनी म्हटले होते. तसंच आमदार-खासदार यांनी या मुद्द्यावरुन मागे हटू नये, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दरम्यान, मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यात कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मराठा आरक्षण हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीतील नाही, असे महाविकास आघाडी सरकारचे म्हणणे आहे. तरी देखील सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर ठाम असून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत