भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम; वर्धापनदिनी भाजपवर टीका, शिवसेनेचे कौतुक

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम; वर्धापनदिनी भाजपवर टीका, शिवसेनेचे कौतुक

पक्षाचे प्रमुख नेते खा. प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपवर टीका केली, तर पक्षाचे अध्यक्ष दस्तुरखुद्द शरद पवार यांनी शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरे यांची तारीफ केली.

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाईल, अशी चर्चा होत असताना राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी २२व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजपवर कडाडून टीका केली. पक्षाचे प्रमुख नेते खा. प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपवर टीका केली, तर पक्षाचे अध्यक्ष दस्तुरखुद्द शरद पवार यांनी शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरे यांची तारीफ केली.

भाजपची सत्ता आल्यापासून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता विचारांना धक्का देण्याचे काम सुरू आहे. लोकशाही टिकवून ठेवणाऱ्या संस्था मोडीत निघाल्या. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. त्यांचे स्वातंत्र्य किती आहे. त्यांच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला जातो. सगळे पत्रकार एकाच सुरात, एकाच भाषेत कसं ट्विट करतात, हे बघितल्यावर लोकशाही संकटात आल्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

देशात अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांनी देशाच्या राजकारणात उलथापालथ होत असल्याचे स्पष्ट केले आहे. अशावेळी देशपातळीवर व्यापक व्यासपीठावर शरद पवार यांची मोठी गरज लागणार आहे, असे सांगून खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे राजकीय वजन वाढवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता आणली. त्यांच्या वेगळ्या पक्षाची सुरुवात त्यांच्यासह अजून केवळ तीन आमदारांनी झाली होती. पण, त्यांनी कठोर संघर्ष करून त्यांच्या पक्षाला आज इतके पुढे आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर स्थापनेपासूनच सत्तेत राहिला. आपले नेते हे देशातील सर्वात अनुभवी नेते आहेत. त्यामुळे त्यांना ताकद देऊन त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

कोरोनाच्या काळात राजेश टोपे उत्तम काम करीत आहेत. स्वतःची क्षमता त्यांनी या संकटकाळात सिद्ध केली आहे, असे गौरवोद्गारही शरद पवार यांनी काढले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, औषध व अन्न प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले यांच्यासह विविध सेलचे प्रमुख नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती

दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र नाही
झुकला दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली. राजकीय आयुष्य जगताना ते स्वाभिमानाने व सर्वधर्मसमभावाने कसे जगावे, हे आपल्याला पक्षाने आणि शरद पवार यांनी शिकवले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सुप्रिया सुळे बसल्या कार्यकर्त्यांमध्ये
खासदार सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांसाठी टाकण्यात आलेल्या खुर्चीवर कार्यक्रम संपेपर्यंत बसून होत्या. त्याचीही कार्यक्रमस्थळी चर्चा होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आदी उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत