भाजप नेत्या पंकजा मुंडेना झाली कोरोनाची लागण

भाजप नेत्या पंकजा मुंडेना झाली कोरोनाची लागण

महाराष्ट्र : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रसार होत असताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती जनतेला दिली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असल्याने आपल्यालाही लागण झाली असल्याची शक्यता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसेच कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे मला संसर्ग झाला असावा. माझ्यासोबत जे होते त्यांनीदेखील चाचणी करुन घ्या..काळजी घ्या”.

दरम्यान २४ एप्रिलला शनिवारी संध्याकाळी भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वस्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

प्रीतम मुंडेंनी पोस्ट केला हा व्हिडिओ!
खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून लोकांना आवाहन करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. “गेल्या आठवड्यात १४ ते १८ एप्रिलमध्ये जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. १८ तारखेला मुंबईत आल्यानंतर मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा हे लक्षणं जाणवायला लागले. २१ तारखेला मी RTPCR चाचणी केली. पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण सगळ्यांना मी आवाहन करते की फक्त RTPCR चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला कोरोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणं असतील, तर त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून मी घेत आहे”, असं प्रीतम मुंडे यांनी सांगितले.

योग्य उपचार आणि काळजी घ्या”
धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत सदिच्छा व्यक्त केल्या. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणं आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेनं लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो”, असं धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये दिल्या होत्या.
author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत