बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्यातला कोरोनाचा प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आणि त्यांचं गुणांकन कसं होईल, याविषयी चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती ट्विटरवर दिली आहे.

बारावीच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनचं धोरण लवकरच जाहीर केलं जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यानंतर सुधारित मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर यासंदर्भातली घोषणा केली आहे.

“विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे”, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातला शासन आदेश ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

या जीआरमध्ये अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात देखील माहिती दिली आहे. बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत, तसेच गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश जारी करण्यात येतील, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत