पेहराव ते फॅशन

पेहराव ते फॅशन

नऊवारी साडी, फेटे ही खरी महाराष्ट्राच्या वस्त्र परिधानची ओळख आहे. रोजच्या पेहरावाचा भाग आता मराठमोळी फॅशन म्हणून रॅम्पवर मिरवली जाऊ लागली आहे. हा पारपंरिक पेहराव म्हणून सण-समारंभापुरता का होईना, आपण परिधान करायला लागलो आहोत.

अन्न –वस्त्र- निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, असं म्हटलं जातं. पण त्यातल्या वस्त्र ह्या प्रकाराने घेतलेलं गरज ते फॅशन पर्यंतचं स्थित्यंतर मानवाच्या एकूणच सामाजिक, राजकीय, वैचारिक जडणघडणीचा इतिहास सांगणारं आहे. कापड ह्या गोष्टींच्या उगमाचा इतिहास इसवीसन पूर्व साडेसहा हजार वर्षांपासूनचा आहे, असं मानलं जातं. पण ह्याच कपड्याने माणसाची संस्कृती उभी केली.
कपडे जेव्हा लज्जा रक्षणासाठी निश्चितच नव्हते, तेव्हाही माणूस जगत होता. त्यामुळेच कापडाची सुरुवात शरीर सजवण्यासाठी झाली असावी, असा अंदाज इतिहासतज्ज्ञ मांडतात. पाने, मोती, शंख-शिंपले यांनी देह सजवण्याचे पुरावे आढळतात. पण नेमकं वस्त्र कसं आणि का वापरलं गेलं, याविषयीच्या संकल्पना मांडताना, बदलत्या हवामानाशी सामना करण्यासाठी कपड्याचा वापर करण्यात आला असावा, असं म्हटलं जातं. त्यातूनच कपडयाचा शोध विकसित झाला असावा, असंही मानलं गेलं.
मानवी टोळ्या स्थलांतरित होणं जसं थांबलं, तशी तिची एक संस्कृती आकारास येत गेली. पाषाणयुगात गुहेत काढलेल्या चित्रांमध्ये कपडयात वावरणारी माणसं दिसतात. त्यातून शरीर झाकणं हे त्या संस्कृतीचा भाग झालं. त्याची सुरुवात त्या-त्या हवामानाशी जुळवून घेण्याच्या गरजेतून झाली असावी, असं निश्चितपणे म्हटलं जातं. त्यामुळेच थंड हवामानाच्या प्रदेशात लोकरीचे कपडे तर गरम हवामानांच्या प्रदेशात सुती म्हणजेच कापूस-जवसापासून तयार होणारे कपडे घालणं हे वैशिष्ट्य ठरलं. पाषाणयुगात गुहेत काढलेल्या चित्रांमध्ये कपडयात वावरणारी चित्रं दिसतात. अगदी सिंधू नदीच्या तीरावर सापडलेल्या हडप्पा संस्कृतीत थेट कपडयाचे पुरावे फारसे आढळत नाही. तरी कपडयांचा वापर निश्चितपणे होत होता, हे स्पष्ट होतं.

iner4

उष्ण प्रदेशात मानवाने परिधान केलेला वेश हा अंगाभोवती गुंडाळून तयार केलेला होता. त्याचं कारण हवा खेळती राहून शरीराचं तापमान थंड ठेवणं हाच असणार. पण पुढे हेच शहाणपण माणसाची संस्कृती अधोरेखित करणारं ठरलं. त्यामुळे आजचा भारत आणि जवळपासच्या अनेक देशांत सुती किंवा फारसे न शिवलेल्या कपडयांचा वापर केला गेल्याचं आढळून येतं. शिवण्याच्या कला आणि झालेली वेगवेगळी आक्रमणं यामुळे पेहरावांमध्ये बदल होत गेल्याचा इतिहास अतिशय रोमांचकारी आहे. विशेष म्हणजे स्त्री-पुरूष पेहरावात लिंगानुरूप फरक नसलेला पेहराव आक्रमणकर्त्यांच्या काळात बदलत गेला. याचं ठळक उदाहरण म्हणजे लुंगी किंवा धोतरासारखा पेहराव स्त्रियाही करत होत्या, हे सहज लक्षात येऊ शकतं. पदर, परकर, ब्लाऊज अशा गोष्टी बाह्य आक्रमणांमुळे आपल्या पेहरावात आल्या. त्याच आपल्या संस्कृतीचा भाग झाला. यात वादविवाद किंवा मतप्रवाह आढळत असले तरी एकूणच आपण ज्याला आपला म्हणू किंवा पारंपरिक म्हणावा असा जो पेहराव झाला तीच आपली संस्कृती आहे, असं ठामपणे म्हणता येणार नाही. तरीही भारतीय म्हटलं की साडी आणि धोतर हा आपला पेहराव मानला जातो.
भारतापुरता विचार केला तर देशभरात वस्त्राचे असंख्य प्रकार आजही आपल्याला दिसतात. प्रत्येक प्रांतानुसार कपड्यांमध्ये विविधता आढळते. साडी हा प्रकार किमान पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं मानलं जातं. खरं तर साडीसदृश वस्त्रप्रकार भारतीयांशिवाय अनेक भागात आजही नेसला, परिधान केला जातो, तरीही साडी भारतीय संस्कृतीचं प्रतीक मानली जाते. का तर तो पेहराव कालौघातही टिकवला गेलाय, त्यात बदल झाले तरी तो परिधान करणं हे आपली परंपरा मानली गेली आहे.

iner2

भारतीय पेहरावात साडीचं आगमन पाच हजार वर्षांपूर्वीचं असल्याचं मानलं जातं. तरीही देशाच्या वेगवेगळ्या भागांत ती नेसण्याची पद्धत मात्र वेगवेगळी आहे. अगदी पदर घेण्यातूनही हे वेगळेपण ठसठशीत पद्धतीने समोर येतं. भारतात साडी नेसण्याचे सुमारे साठ ते ऐंशी प्रकार आहेत, असं मानलं जातं. तरीही त्यात अन्य साड्यांच्या तुलनेत नऊवारी हा महाराष्ट्रीय पेहराव मानला जातो. नऊवारी साडी महाराष्ट्राबाहेरही, विशेषत: दक्षिणेकडील आणि गोव्यात नेसली जाते. तरीही तो महाराष्ट्रीय महिलांचा पहेराव मानला जातो. तर पुरूषांचे धोतर आणि फेटा हा पेहराव पारपंरिक पेहराव मानला जातो. अर्थात ह्या पेहरावात काळानुरूप बदल होत गेलेत. तो इतिहास पाहताना, सामाजिक स्तर हा घटकही लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे गरिबांचे आणि श्रीमंताचे कपडे वरकरणी सारखे वाटले तरी त्यात फरक आहे.

नऊवारी साडी म्हणजे नऊ वार सलग असलेली. नऊवारी साडी ही नेसण्याची पद्धत धोतरासारखीच असते. त्यामुळे ती प्राचीन पद्धत असावी. कारण त्यावेळी स्त्री आणि पुरूष असा भेद कपड्यांच्या बाबतीत असणार नाही, अशी शक्यता आहे.श्रीमंत आणि गरीब असा भेद त्याच्या नेसण्याच्या पद्धतीत ठळकपणे दिसतो. तरी कोणतंही काम करण्यासाठी सहजपणे वावरता येईल, असा हा वस्त्रप्रकार आहे. अर्थात कालौघात नऊवारी ही नेसणं, त्यात वावरणं अवघड आहे, असा मतप्रवाह अधिक जोरदार ठरत नऊवारीची जागा पाचवारी साडीने घेतली. कष्टकरी वर्गातल्या स्त्रिया घोट्याच्यावर किंवा गुडघ्याखाली नऊवारी नेसत. तर श्रीमंत उच्च वर्गातल्या स्त्रिया घोळदार नऊवारी नेसत. नेसण्याच्या पद्धती जरी बारकाईने पाहिल्या तर हा वर्गीय, स्तरीय भेद सहजपणे लक्षात येतो. मात्र सरसकट नऊवारी हा महाराष्ट्रीय महिलांचा पेहराव मानला जातो. अगदी गेल्या काही वर्षांत शिवलेली नऊवारी असा नवाच प्रकार उदयास आलाय आणि भलताच लोकप्रिय ठरला आहे. हेही ह्या पेहरावाच्या स्थित्यंतराचा भाग ठरावा.

अगदी महाराष्ट्रात म्हटलं तरी प्रत्येक भागात नऊवारी नेसण्याची पद्धत वेगळी आहे. केवळ साधे काठ असलेली नऊवारी ही आजच्या पिढीतल्या लोकांनी आपल्या आजींना नेसताना पाहिलेलं आहे. काही ठराविक रंगात अजिबात वेलबुट्टी किंवा नक्षीकाम अगदी जरीकामही नसलेल्या साध्या सुती नऊवारी साड्या घराघरातल्या बायका नेसत. रंगही अगदी मोजकेच असायचे. पण शेतात काम करणं, किंवा उन्हातान्हात थंडावा देणाऱ्या ह्या नऊवारी साड्या रोजच नेसल्या जात. विशेष म्हणजे त्यावर चोळी घातली जायची. आज चोली असं म्हटलं की त्याला जे ग्लॅमरस रूप डोळ्यासमोर येतं आणि केवळ सिनेमा आणि फॅशन शोमध्ये ती मिरवली जाते, तीच चोळी आपली आजी रोज घालत असे, हे आठवूनही आश्चर्य वाटतं. तर डिझायनर नऊवारीपर्यंत पोहोचलेला प्रवास आधीचे सामाजिक भेद पुसून टाकणारे ठरलाय.

iner1

मुसलमानी आक्रमणांनंतर आपल्या वस्त्रप्रावरणांमध्ये झपाट्याने बदल होत गेला. तुमान, अंगरखा, अचकन अशा वस्त्रांना पुरूषांनी आपलंस केलं. तरी धोतर आणि फेटे कायम राहिले. पागोटे, पटका, फेटे असा फेरफारही आलाच. श्रीमंत वर्गात जरी, रेशीम तर गरीबांमध्ये खादी, सुती कपड्यांचा वापर होत. तर इंग्रजांच्या शासनकाळात हा पारंपरिक पेहराव अगदीच मागे पडला. इंग्रजी माघारी गेले तरी पुरुषांनी धोतर, लेंगा ते पँट हा प्रवास झपाट्याने केला. स्त्रियाही नऊवार ते पाचवार अशा स्थित्यंतरातून सलवार-कमीज ते जिन्सपर्यंत पोहोचल्या.
चित्रपटांचा फार मोठा प्रभाव ह्या पेहरावाच्या बदलांमध्ये दिसतो. साठ-सत्तरीच्या दशकांत साडीऐवजी पंजाबी ड्रेस घातलेली हिरॉइन दाखवणं ही मोठी क्रांतीच मानली गेली. त्यानंतर बहुतांश जनता, पडद्यावरच्या कपड्यांचं, पेहरावाचं अनुकरण करायला लागल्याचं दिसतं. साडी नेसणं हे कौशल्य आहे, यात वादच नाही. पण आपल्या घरातल्या स्त्रिया हे कसब रोजच दाखवत होत्या, हा विचार मागे पडला आणि नऊवारीची जागा पाचवारी आणि त्याची जागा पंजाबी ड्रेसने कधी घेतली हेच कळलं नाही. खरं तर नऊवारी इतकं आरामदायी असं काहीच नव्हतं. पण इतकं मोठं कापड का वाया घालवलं जातं, अशा विचाराने नऊवारची जागा पाचवार साडीने घेतली. पण साडीबरोबरच पाश्चात्य सुटसुटीत कपडयाचं आकर्षण वाटण्याची वेगवेगळी कारणं होती. तरीही देशभरात वेगवेगळ्या भागांत विविध प्रकारच्या साड्या, त्यांचे प्रकार हे भारतीय संस्कृतीचा भाग बनून राहिले. त्यात सुदैवाने फॅशन डिझायनर, टीव्ही मालिका, चित्रपट यांच्यामुळे साडीचा ग्लॅमरस ते क्लासिक पेहराव अशी ओळख साडीच्या पथ्यावर पडली आहे.

iner3

आज नऊवारीलाही फॅशन मानलं जातं आहे. रोजचा पेहराव ते फॅशन असा प्रवास आपल्या ह्या पेहरावाने केला आहे. कधीकाळी विशिष्ट वर्गाने किंवा जातीचं वैशिष्ट्य दाखवणारी ही नऊवारी आज हौसेने पेशवाई नऊवारी म्हणून सणासमांरभात मिरवली जाते. लग्नप्रसंगी नेसली जाते. त्यातून आपण आपली संस्कृती टिकवून ठेवतोय, याचं समाधान मानलं जातंय. कधी काळी नऊवार लुगडं नेसणारी आजी फार तर हा रंग नको, तो द्या, एवढ्याच पर्यायात आनंदी होती. आता नऊवार साडीच्या असंख्य रंगात, डिझायनमध्ये झालेलं जतन पाहून आश्चर्य वाटतं. आजोबांचे पटके, फेटे पाहणं, हा तर एक आनंददायी सोहळा असायचा. ज्याला एथनिक म्हटलं जातं अशा रंगात हे फेटे रंगलेले असायचे. नैसर्गिक रंगांत रंगलेले फेटे पंधरवड्यातून एकदा घरीच रंगवले जायचे. लग्नासाठी जरतारी फेटे असायचे. भगवे, केशरी अशा रंगाचे डौलदार फेटे आनंदाच्या प्रसंगी उडवले जायचे. ह्या फेट्यांचे शेले कधी लांब कधी छोटे का, असायचे, याचीही काही कारणं असायची. काम करताना शेला खोचला जायचा, तर फेरफटक्याला जाताना तो खाली सोडला जायचा. आज नऊवारीप्रमाणे फेट्या, पटक्यांना खास दिवशी लेवून मिरवलं जातं. विशेष म्हणजे स्त्रियांनाही आता फेटे नेसवले जातात. गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा पाहताना हीच ती आपली मराठी संस्कृती, हाच तो आपला मराठी पेहराव असं म्हटलं जातं. खरं आपल्या आजीला असा फेटा घालायला कोणी परवानगी दिली असती का, असं नक्कीच वाटून जातं. पण स्त्री-पुरूष भेदाला फाटा देत मिरवायला मिळत असलेला असा पेहराव हीच आपली संस्कृती असं मानायला काय हरकत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत