पाण्यात तरंगत्या प्रेतांवर कोणाचं नाव लिहिलंय ?

पाण्यात तरंगत्या प्रेतांवर कोणाचं नाव लिहिलंय ?

महामारीच्या माराने चलत्यांची प्रेत झाली आणि मृत्यू होऊन मृतदेहाने थकून चितेवर आराम केला.
तो आराम ही सोप्पा नव्हता, आजारपणात रुग्णालयासाठी,औषधांसाठी,कधी ऑक्सिजन साठी तर कधी बेड साठी कित्येक वेळा मरावं लागलं. तेव्हा कुठं जाऊन मृत्यू ने त्या दमलेल्या शरीराला स्वीकारलं, व्यक्ती म्हणणं आज तरी पाप वाटावं काही लोकांना, कारण आजकाल प्रत्येक मृत व्यक्ती हा नुसता आकडा बनून राहिला आहे. पण त्या प्रत्येक आकड्याला अंत्य विधी मिळत नाहीत.

Afghanistan Flood AP 0

काही प्रेतांच्या हाडाला चीटकलेले मास जनावरांनी खाल्ले तर काहींना मृत्यू नंतरही नदीतून प्रवास करावा लागत आहे. तो माउंसाचा लगदा खर तर प्राण्यांच्या जबड्यात नसून काही पाषाण हृदयी लोकांच्या ताटात आहे. तो घास पचेल का ह्यांची शंका आहेच म्हणा पण वाहणारी प्रेत कोणाच्या नावे असावी ? पाण्यावर तरंगत असलेल्या दगडांनी रामायण कायमस्वरूपी लोकांच्या चर्चेत ठेवलं परंतु प्रेताच्या तरंगण्याने तयार होणाऱ्या सेतू ला कोणाचं नाव द्यावं ? ४ कोटीला विकल्या जाणाऱ्या कोटावरील धूळ झटकून काढावी अशी जबाबदारी झटकून काढणाऱ्या लोकांच्या हाथात सुरा आणि गळा दोन्ही देऊन बसलो आहोत. ज्या देशात रुग्णालये कमी आणि स्मशाने अधिक गरजेची वाटू लागली आहेत अश्या देशात कोट्यवधींच्या वास्तू प्रेतांच्या टाळूवरचे लोणी विकून बांधल्या जात आहेत. खरंतर विकासाच्या आड येणारी वृत्ती नसावीच पण भुकेल्या व्यक्तीला सोनेरी ताटापेक्षा अन्नाचा घास अधिक महत्वाचा असू नये का ? आणि ह्यांच्या ह्या सोनेरी ताटाखालची मांजरं ही नकळत त्या तरंगत्या माउंसाच्या गोळ्याचा आस्वाद घेतच आहेत.
ह्यांच्या भुका मिटणाऱ्या नाहीत हे आजवर लोकांना कळून चुकलंय, कोरोनावरील लसी घेण्याआधी ह्यांनी भस्म्याचं औषध घ्यायला हवं होतं पण त्यांना हा रोग आवडायला लागलाय आता.

– आकाश कांबळे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत