पंतप्रधान मोदींसोबत ‘ती’ भेट झाली का?; नातं तुटलं नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचं ‘शरीफ’ उत्तर

पंतप्रधान मोदींसोबत ‘ती’ भेट झाली का?; नातं तुटलं नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचं ‘शरीफ’ उत्तर

नवी दिल्ली: मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. जवळपास दीड तास ही बैठक सुरू होती.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधानांची बैठक झाली. या भेटीसोबतच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात व्यक्तीगत स्वरुपाची भेट झाल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होती. त्याबद्दल पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला. त्यावर ‘आम्ही बराच काळ एकत्र होतो. सत्तेत सोबत नाही याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. अशा भेटीत काहीच गैर नाही. मी काही नवाज शरीफांना भेटलेलो नाही. आपल्या पंतप्रधानांना भेटलो आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारचं शिष्टमंडळ आज दिल्लीत पंतप्रधानांना भेटलं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा दुसरा दिल्ली दौरा होता. त्यात मोदी आणि ठाकरेंमध्ये वैयक्तीक भेट होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अजित पवारांसोबत पहाटे घेतलेली शपथ आपली चूक होती, अशी कबुली थोड्याच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यामुळे मोदी-ठाकरेंच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत