धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण

धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण

ठाणे : धर्मांतरासाठी आपल्या नवऱ्यावर जबरदस्ती करणाऱ्या एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात ही घटना घडली असून तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातील गुन्हा दाखल झाला आहे.

३६ वर्षीय प्रदीप नागेले हे मध्य प्रदेशमधील इंदोर शहराचे रहिवासी. गेल्या काही दिवसांपासून नागेले यांच्यावर त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांकडून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता. नागेले यांनी ख्रिस्ती धर्म स्विकारावा यासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून प्रयत्न सुरु होता. त्यासाठी त्यांना निरनिराळ्या गोष्टींची प्रलोभने दाखवण्यात येत होती. पण ते तयार नव्हते. त्यांच्या पत्नीने त्यांना ख्रिस्ती धर्म स्विकारण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लालूच दिली. पण नागेले काही केल्या तयार नव्हते. अखेर संतप्त होऊन त्यांच्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबियांनी नागेले यांना मारहाण केली.

या घटनेनंतर नागेले यांनी इंदोर येथील द्वारकानाथ पोलीस ठाण्यात आपली पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी प्रदीप नागेले यांनी असाही आरोप केला आहे की त्यांचे धार्मिक पुस्तक कुटुंबीयांनी फाडले. नागेले यांची पत्नी आणि मेव्हणी यांनी एक स्कुटर आणि आर्थिक मोबदला घेऊन धर्मांतर केले असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणात नागेले यांनी एका अनुपम ब्रदरचेही नाव घेतले आहे. ज्याने २५ फेब्रुवारी रोजी नागेले यांना प्रलोभित करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन यात नागेले यांच्या पत्नीसह इतर ९ जणांची नावे आहेत. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावणे, गुन्हेगारी पद्धतीने दबाव आणणे या प्रकारची कलमे लावण्यात आली आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत