डॉ वा.ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे एकोनतीसावे पुष्प ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ उमा शंकर यांनी गुंफले

डॉ वा.ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे एकोनतीसावे पुष्प ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ उमा शंकर यांनी गुंफले

सकारात्मकपणे जगता आले पाहिजे : डॉ उमा शंकर

दि 21 मे 2021 रोजी विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयातर्फे आयोजित स्वर्गीय डॉ वा.ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे एकोनतीसावे पुष्प जेष्ठ तत्वज्ञ व एस. आय. ई. एस. सायन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उमा शंकर यांनी गुंफले. “आध्यात्मिक उन्नतीचे गुपित”या विषयावर दुरदृश्य प्रणाली द्वारे त्यांनी आपले विचार मांडले.

याप्रसंगी प्रारंभीच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यात्मिकता या शब्दाची व्याख्या करताना आपल्या दैनंदिन जीवनात संतुलित पद्धतीने जगता येणे म्हणजे अध्यात्मिकता असे त्या म्हणाल्या. ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वात स्वर्गीय डॉ वा. ना. बेडेकर यांनी केलेल्या योगदानाचा त्यांनी समर्पक उल्लेख करत; ही व्याख्यानमाला विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पालक व सुजाण ठाणेकरांसाठी महत्त्वाचा ठेवा आहे असे त्या म्हणाल्या.

डॉ उमा शंकर यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्तीच्या जडण-घडणीत श्रद्धा, भक्ती, सद्गुननिष्ठा या महत्त्वाच्या प्रेरणा आहेत असे नमूद केले. एखादी व्यक्ती सश्रद्ध आहे म्हणजे तिच्यामध्ये निर्भयता, आत्मविश्वास, दृढनिश्चय व एकनिष्ठता हे गुण असतात. रोजच्या जगण्यात अध्यात्मिकता येणे म्हणजे सकारात्मकपणे सर्व गोष्टींकडे पाहणे होय. अंत:करणात शांती, जगाप्रति निष्कलुश प्रेम, साधी राहणी व उच्च विचारसरणी हे गुण आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अंतर्भूत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

सनातन धर्माची पताका दिगंतात फडकवणारे आदि शंकराचार्य त्यांचे कार्यही व्यक्तीच्या उत्थानाला मार्गदर्शक ठरणारे असून भगवद्गीतेमध्ये देखील “मा शुच।” अर्थात काळजी न करता आपले कर्म करत राहावे हा सिद्धांत मंडला गेला आहे असे त्या म्हणाल्या.

03e4aadd 6138 46c7 afe5 1a070d1e5b0f

डॉ उमा शंकर यांनी ज्येष्ठ पाश्चात्य धर्म विचारक’इव्हागरियस पॉंटिकस’, दक्षिण भारतातील नयनमार संत’कराईकल आम्मयार’ व पश्चात पर्शियन कवी व तत्त्वज्ञ जलालूद्दीन रुमी या तीन वेगवेगळ्या काळात जगलेल्या व लोकोत्तर काम केलेल्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाश टाकला. दक्षिण भारतातील नयनमार व अलवार या भक्ती परंपरेचा उल्लेख करत लोकांचे जीवन अध्यात्मिकतेने भारुन सकारात्मक जगण्याचा पायंडा या संत परंपरेने पाडला असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर तुकाराम आदि संत परंपरेचे योगदान देखील याच तोडीचे आहे.

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये सगळीकडे नकारात्मक वातावरण पसरले असून; आशादायी विचार घेण्यासाठी आपल्याला भारताच्या अध्यात्मिक परंपरेकडे वळले पाहिजे असे डॉ उमा शंकर म्हणाल्या. “सृष्टीच्या उत्पत्ती पासून निसर्गनियमानुसार सर्व गोष्टी वेळेवर होत असून माणसाने आपल्या स्वार्थीपणा मुळे निसर्गाचा समतोल नष्ट केला आहे. यातून बाहेर येण्यासाठी अध्यात्मिक जीवनाची कास धरावी लागेल” असे त्या म्हणाल्या.

या व्याख्यानाचा लाभ बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक संशोधक यांनी घेतला. या व्याख्यानाच्या संयोजनाची जबाबदारी उपप्राचार्य डॉ महेश पाटील यांनी सांभाळली; तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अंजली पुरंदरे यांनी केले.प्रा प्राची नितनवरे यांनी तांत्रिक सहकार्य केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. या व्याख्यानमालेतील सर्व व्याख्याने जिज्ञासूंसाठी युट्युब वर विनामुल्य उपलब्ध करण्यात आले असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितले.

©शुभम शंकर पेडामकर

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत