टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर अश्विनच्या घरात १० जणांना झाली कोरोनाची लागण

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर अश्विनच्या घरात १० जणांना झाली कोरोनाची लागण

चेन्नई :  टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन  याच्या घरातील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. अश्विनची पत्नी प्रीती नारायण हिने याबाबतची माहिती दिली आहे. दिल्ली कॅपिटल्स टीमचा सदस्य असलेल्या अश्विनने कोरोनाशी लढणाऱ्या परिवाराला मदत करण्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तसेच त्याच्या प्रितीने ट्विट करुन घरातील परिस्थितीची सविस्तर माहिती जनतेला दिली आहे.

“मागच्या आठवडाभरात घरातील 6 मोठ्या आणि 4 लहान व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. हे सर्व जण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होते. मागचा आठवडा हे एक वाईट स्वप्न होतं. आमच्या तीन पालकांपैकी एक जण आता घरी परतले आहेत. सर्वांनी लसीकरण करुन घ्या. तुमचं आणि तुमच्या परिवाराचं या महामारीपासून संरक्षण करा.” असं प्रितीनं सांगितले आहे.

प्रिती म्हणाली की, “मानसिकरित्या बरं होण्यापेक्षा शारीरिकरित्या बरं होण सर्वात सोपं आहे. मागच्या आठवड्यातील तीन दिवस सर्वात गंभीर होते. प्रत्येक जण मदत करण्यासाठी तयार होतं. पण, जवळ कुणीच नव्हतं. हा आजार तुम्हाला अगदी एकटा पाडतो.” या शब्दात प्रितीने घरातील परिस्थितीचे वर्णन केले आहे.यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धची मॅच झाल्यानंतर अश्विनने आपीएलमधून माघार घेण्याची घोषणा केली होती.  कुटुंबातील काही जणांना कोरोनाची  बाधा झाली असल्याची माहितीही त्याने यावेळी दिली आहे. अश्विनने ट्विटमध्ये  म्हटले की, मी आयपीएलमधून माघार घेत आहे. माझं कुटुंब सध्या कोविड-१९ या विषाणूशी झगडत आहे. त्यामुळे या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. सर्व गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएल खेळेल असे अश्विनने स्पष्ट केले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत