ज़रा आँख में भर लो पानी… विनीत वर्तक ©️

ज़रा आँख में भर लो पानी… विनीत वर्तक ©️

आज हा फोटो बघितला आणि एकाच वेळी दोन्ही डोळ्यातून वेगळ्या कारणांसाठी अश्रू आले….

एकीकडे काल झालेल्या हमल्यात २२ जवान हुतात्मा झाले आहेत तर ३१ जवान जखमी झाले आहेत. एकाचवेळी तिन्ही बाजूने जवळपास ४०० नक्षल आतंकवादी आपल्या जवानांना घेरून मशिनगन ने हल्ला करतात. त्यांच्यासमोर हाताच्या बोटावर मोजता येतील इतके जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता लढा देतात आणि धारातिर्थी पडतात. काल झालेला हल्ला हा भारताच्या बाहेरच्या शत्रूंनी केलेला नाही तर घरातील घरभेदी लोकांनी केलेला आहे म्हणून त्याची तीव्रता जास्त आहे. या नक्षल लोकांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्या नावाने टाहो फोडणारे सगळेच आज गुपचूप लपून बसले आहेत. आज त्यांना रक्ताचा पडलेला सडा दिसणार नाही. आज त्यांना त्या जवानांच्या घरच्यांचा आक्रोश दिसणार नाही, आज ते लोक त्या जवानांची जात, धर्म शोधायला जाणार नाहीत. आज ते लोक मेणबत्ती चा मोर्चा काढणार नाही. आज ते लोक या गोष्टीचा निषेध करणार नाहीत. आज ते लोक कोण्या आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्त्याला भारताची परिस्थिती सांगून ट्विट करायला सांगणार नाहीत. आज मानवाधिकार समितीचे लोक यावर काही बोलणार नाहीत. आज ना कोणी याचा निषेध करणार. ना आज कोणी आपले पुरस्कार परत करणार. कारण शांतीची कबुतरे उडवणारे आज आपले डोळे, कान आणि तोंड त्या ३ माकडांसारखे बंद करून बसले आहेत.

हे घरभेदी लोक आपल्या आजूबाजूलाच आहेत. छुप्या पद्धतीने राजकारण करून समाजात तेढ वाढवायची आणि मग मी नाही त्यातलाच म्हणत आपलं तोंड लपवायचं हीच पद्धत आजतागायत ते वापरत आलेले आहेत. एकाने कोणीतरी आत्महत्या केली म्हणून त्याची जात शोधून त्याला भेटायला जाणारे राजकारणी लोकशाही मेली म्हणून सुतक मनवतात पण तेच लोकशाही चे रक्षणकर्ते आज साधं निषेध करू शकत नाही हाच त्यांचा खरा चेहरा आहे. काल आर.आय.पी. आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहून अनेकांनी एक पान पुढे केलं असेल. कारण ते २२ कोण हे जाणून घ्यायची जाणीव होण्याइतपत ना आम्हाला गरज आहे ना आमची तशी तयारी आहे. लढलेले तिकडेच निघून गेले आणि जखमी झालेले पुन्हा येतील पण आम्हाला त्याच काहीच नाही. संवेदना आणि दुःख हे आमच्या अंतर्मना पर्यंत कधी जात नाही. याला कारण आमचा तिकडे फायदा नाही. आज या न त्या कारणासाठी मोर्चा ते काढणार नाहीत. आज ते उपोषणाला बसणार नाहीत. आज सरकारला त्या बद्दल जाब विचारणार नाहीत. कारण जिकडे जीव टांगणीला तिकडे आम्हाला काहीच देणं घेणं नाही.

इतका मोठा हल्ला हा घरभेदी लोकांशिवाय शक्यच नाही. पण उद्या त्याचा बदला घेतला तर हेच आज लपलेले साप फुत्कारत बिळातून बाहेर येतील. संविधानाची पुंगी वाजवत आणि मानवी हक्कासाठी लढा उभारतील. जातीचं, धर्माचं जे हत्यार उपसता येईल ते म्यानातून बाहेर काढतील. कारण आमच्या संवेदना या सुद्धा आजकाल फायदा, राजकारण, आणि पैसे बघून निर्माण होतात. लाल झेंडा घेऊ की भगवा की हिरवा हे आजकाल विचारांनी नाही तर आमच्या फायद्याने ठरवतो. त्यामुळे त्या २२ जवानांन बद्दल आम्ही काही वाटून घेण्याचं कारण नाही.

पण या सगळ्यात ते मात्र वेगळे आहेत…..

डेप्युटी कमांडंट संदीप द्विवेदी सरांसारखे आमचे जवान आणि ऑफिसर वेगळे आहेत. अंगावर दोन गोळ्या झेलून सुद्धा त्याच आम्हाला कसलीच भीती नाही. आज त्यांचा फोटो बघितल्यावर त्यांच्या चाऱ्यावर असणार ते स्मित हास्य खूप काही सांगून जाते. मी जखमी आहे पण मी लढलो आहे. मी पुन्हा लढेन या आशेवर थम्प्स अप करत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आत्मविश्वास दिला आहे. काही भारतीयांच्या घाणेरड्या राजकारण आणि विचारांना बळी न पडता या घरभेदी शत्रुंना ठोकूच हा तो आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास बघून आज माझ्या दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. आज गरज आहे ती प्रत्येक भारतीयांनी हा आत्मविश्वास दाखवण्याची आणि जे कोणी अश्या पिलावळीच समर्थन करतात त्यांच्या विचारांना जागीच ठेवण्याची. बंदुकीच्या गोळ्यांनी याचा बदला घेतला जाईलच पण शब्दांनी या कुत्सित विचारांना ठोकण्याची जबाबदारी एक भारतीय म्हणून आपण स्विकारायला हवी. त्यासाठी कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेण्याची गरज नाही. विचारांना विचारांनी ठेचायचं असते ते समजण्याची प्रगल्भता जरी आपण आत्मसात केली तर त्या २२ जवानांना ती श्रद्धांजली असेल असं मला वाटते.

वीरगतीला प्राप्त होऊन हुतात्मा झालेल्या त्या २२ जवानांना माझा कडक सॅल्यूट.

“We didn’t start this war, but we will bloody hell finish it,”

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©️) कॉपीराईट आहे.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत