गुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू

गुरू तेगबहादूर : सर्वोच्च बलिदानाचा महामेरू

भारताच्या इतिहासात गुरू तेगबहादूर यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या तारकासमुहाप्रमाणे प्रखर तेजाने झळाळणारे आहे. त्यांचा जन्म अमृतसर येथे गुरू हरगोबिंदजी आणि नानकीजी यांच्या पोटी बैसाखीच्या महिन्यात कृष्ण पंचमीला झाला. नानकशाही कालगणनेनुसार आज त्यांची ४०० वी जयंती आहे. गुरू तेगबहादूर यांची प्रेरणादायी जीवनगाथा शब्दबद्ध केली आहे, दत्तात्रेय होसबळे यांनी.

भारताच्या मोठ्या प्रदेशावर कब्जा करणाऱ्या मध्य आशियातील मुघलांना कडवे आव्हान देणाऱ्या परंपरेत गुरू तेगबहादूर यांचा जन्म झाला होता. त्यांचे आयुष्य हे चिकाटी, असीम धैर्य आणि शारीरिक तसेच मानसिक कणखरपणाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. वास्तविक गुरू तेगबहादूर यांचे आयुष्यच चारित्र्यवर्धनाच्या अनेकोत्तम प्रयोगांचे उदाहरण आहे. आपल्या नकारात्मक भावनांवर विजय मिळवून सामान्य माणूस देखील धर्माचे अनुसरण करू शकतो. इश्वरनिंदा, धनलोभ आणि अहंकाराच्या चक्रव्यूहात अडकलेली माणसे कधीही संकटकाळात स्थिर राहू शकत नाहीत. जेव्हा सामान्य माणसाचे वर्तन सुख- दुःखात बदलते तिथे थोर माणसे या सर्वांच्या पलिकडे असतात. गुरूजींनी सांगितलं की माणसाने ‘प्रशंसा आणि निंदा यांच्या पलिकडे जायला हवं. सोनं आणि लोखंड एकाच नजरेने पाहिले पाहिजे’ तसंच ‘आनंद, वेदना, लोभ, भावनिक नाते आणि अहंकार’ यात वाहवत न जाता जगले पाहिजे.

त्यांच्या शिकवणीत गुरूजींनी सांगितले की, ‘माणसाने कोणाला भय दाखवून नये आणि भीतीही बाळगू नये.’ सर्वात जास्त भय हे मृत्यूचे असते, त्यामुळेच माणूस आपल्या मूल्यांवरचा विश्वास गमावतो आणि भित्रा बनतो. गुरूजी म्हणत, “मी मृत्यूचे भय विसरू शकत नाही आणि ती चिंता माझे शरीर कुरतडून टाकते आहे.” गुरूजींनी आपल्या उपदेशांतून आणि निष्काम सेवेतून एका अशा समाजाची रचना केली, ज्यात कोणताही मनुष्य निर्भयपणे स्वधर्माचे पालन करू शकेल. गुरूजींचे स्वतःचे आयुष्य हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साधण्याचे उत्तम उदाहरण आहे. गुरुजींनी धर्मासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांनी संकटात देखील आशा आणि विश्वासाची कल्पना केली. गुरूजींचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, “मी पुन्हा एकदा शक्ती मिळवली आहे, सर्व बंधने गळून पडली आहेत आणि माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत.” गुरू तेगबहादूर यांच्या विचारांचा एवढा प्रभाव पडला की, देशाला जखडून ठेवणाऱ्या साखळदंडांना या विचारांनी हादरे दिले आणि मुक्तीच्या मार्ग खुला केला. त्यांच्या ब्रज भाषेतील विचारांतून भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि अध्यात्माचे उत्तम दर्शन घडते.

guru 647 112416115401

गुरूजींचे निवासस्थान, आनंदपूर साहिब हे मुघलांच्या अन्याय आणि अत्याचारविरोधातील लढ्याचे केंद्र होते. औरंगजेबाला संपूर्ण भारताचे रुपांतर दार- उल- इस्लाममध्ये करायचे होते. देशातील बौद्धिक आणि आध्यात्मिक केंद्र असलेले काश्मिर, हे औरंगजेबाचे प्रमुख लक्ष्य होते. त्यामुळे काश्मिरमधल्या लोकांनी गुरूंकडे मदत मागितली, ज्यावर गुरूजींनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सर्वत्र भयाण परिस्थिती होती. क्रूरकर्मा मुघलांना कसे परास्त करावे हाच मुख्य सवाल सर्वांसमोर होता. त्यासाठी एकच मार्ग होता. एखाद्या थोर व्यक्तीने त्याच्या देशाच्या संरक्षणासाठी, लोकांच्या विश्वासाच्या रक्षणासाठी बलिदान देणे. या बलिदानाने देशभरातील लोकांमधील चेतना जागृत झाली असती ज्यामुळे मुघलांच्या सत्तेला हादरे दिले असते. हे बलिदान करणार कोण? या कोड्याचे उत्तर गुरुजींच्या मुलानेच, श्री गोविंद राय याने दिले. त्याने आपल्या वडिलांना विचारले, संपूर्ण देशात तुमच्यापेक्षा अधिक आदर आणि आब राखून असलेले दुसरे कुणी आहे का?

औरंगजेबाच्या सैन्याने गुरूजींना आणि त्यांच्या तीन शिष्यांना दिल्लीत बंदी बनवले. त्यावेळी इस्लाम धर्मात परिवर्तीत होण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. सर्व प्रकारची आमिषे दाखविण्यात आली. परंतु गुरूजी त्यांच्या धर्ममार्गावर अढळ राहिले. त्यांची ही निष्ठा पाहून चवताळलेल्या मुघलांनी गुरुजींच्या समोरच चांदणी चौकात या शिष्यांचे हाल-हाल केले. मुघलांनी भाई माटी दास याला करवतीने कापले, भाई दियाला याला उकळत्या तेलात टाकले, भाई सती दास याला वाळलेलं गवत आणि कापसात बांधून जिवंत जाळले. मुघल शासकांना वाटले, की आपल्या शिष्यांना मिळालेली ही वागणूक पाहून गुरूजी भयभीत होतील.

गुरूजींना माहित होते की, धर्माचा मूळ गाभाच अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरोधात लढणे हा आहे. अखेरीस गुरूजी बधत नाहीत हे पाहून काझींनी त्यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. त्यांच्या या बलिदानामुळे देश जागृत झाला. आपल्या वडिलांच्या हौतात्म्याबाबत बोलताना दहावे गुरू श्री गोविंद सिंग म्हणाले, “त्यांनी ‘तिलक’ आणि जानव्याचे रक्षण केले. त्यांचे बलिदान ही कलियुगातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. संतसज्जनांसाठी त्यांनी आपले प्राण जराही न कचरता त्यागले.”

आजचा दिवस जेव्हा संपूर्ण देश गुरूजींची ४०० वी जयंती साजरी करतो आहे, तेव्हा याचे स्मरण ठेवू की त्यांच्या मार्गाचे पालन करणे हीच त्यांना वाहिलेली सर्वोच्च आदरांजली असेल. आजच्या काळात भौतिक सुखात आनंद मानण्याची प्रवृत्ती बोकाळली आहे. गुरूजींना मात्र त्याग आणि संयमाचा मार्ग दाखवला होता. हेवा, द्वेष, स्वार्थीपणा आणि भेदभाव सर्वत्र आहेच, परंतु आदरणीय गुरूजींनी निर्मिती, एकात्मता, आणि मनातील सर्व अवगुणांवर विजय मिळवण्याचा संदेश दिला.

त्यांनी दिलेल्या शिकवणुकीचा चिरस्थायी प्रभाव म्हणजे दिल्लीकडे जाता आजतागायत तेथील लोक तंबाखूची शेती करणे टाळत आले आहेत. कट्टरतावादी शक्ती आपल्या वर्चस्वासाठी उभ्या राहत आहेत, परंतु गुरूजींनी आपल्याला शौर्य, निस्वार्थ आणि त्यागाचा मार्ग दाखवला आहे. जेव्हा मानवजात एका नव्या काळात प्रवेश करत आहे अशा वेळेला गुरूजींचे स्मरण आपल्याला त्यांच्या विचारांच्या मार्गावरून चालण्यास आणि या मातीत रुजलेल्या त्यांच्या विचारांच्या आधारावर नव्या भारताची उभारणी करण्यास भाग पाडत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत