क्रिकेट वर्तुळात बांबूच्या बॅटची चर्चा; नियम काय सांगतोय?

क्रिकेट वर्तुळात बांबूच्या बॅटची चर्चा; नियम काय सांगतोय?

जागतिक क्रिकेट वर्तुळात सध्या बॅटसाठी कोणते लाकूड योग्य अशी चर्चा सुरु आहे. केंब्रीज विद्यापीठातील दर्शिल शहा आणि बेन टिंक्लेर – डाव्हिस यांनी केलेल्या अभ्यासानुसार बांबूपासून तयार केलेली बॅट ही टिकायलाही चांगली आहे आणि तयार करण्यासाठी खर्चही कमी येतो असा दावा केला आहे. त्यामुळे सध्या विलो पासून तयार करण्यात येणाऱ्या बॅटला हा उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरु शकतो अशी चर्चा सुरु झाली होती.सध्या इंग्लिश विलोची चांगल्या दर्जाची बॅट घ्यायची झाली तर त्याची किंमत १० ते १५ हजाराच्या घरात जाते. त्यामुळे बांबूपासून तयार होणारी किफायतशीर बॅट म्हटल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटपटूंचे कान लगेचच टवकारले होते.

पण, एमसीसीने ( मेरिलबोन क्रिकेट क्लब ) बांबूपासून बॅट तयार करण्याच्या कल्पनेला केराची टोपली दाखवली आहे. एमसीसीने खेळाच्या नियमांनुसार बांबूच्या बॅटला बेकायदेशीर असे म्हटले आहे. एमसीसीने सोमवारी दिलेल्या आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की ‘सध्या नियम ५.३.२ नुसार बॅटचे ब्लेड हे पूर्णपणे लाकडापासून तयार केलेले असावे, बांबू हा गवत प्रकारात मोडते. जर बांबूचा वास्तविक पर्याय म्हणून विचार करायचा झाला तर आपल्याला नियमात बदल करावा लागेल.’

‘महत्वाचे म्हणजे बांबूपासून तयार केलेल्या बॅटला परवानगी देण्यासाठी नियमात बदल करावा लागेल, जरी आपण बांबूला लाकूड म्हणून मान्यता दिली तरी सध्याच्या नियमानुसार ती बॅट बेकायदेशीर ठरेल कारण बॅटला लॅमिनेशन करणे बेकायदेशीर आहे.’ असे एमसीसीने स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, केंब्रिजच्या अभ्यासकांना बांबूपासून तयार केलेली बॅट ही विलो पासून तयार केलेल्या बॅटपेक्षा दणकट आणि कठिण असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर बांबूपासून बॅट तयार केल्यानंतर त्याचा स्वीट स्पॉट हा विलो पासून तयार केलेल्या बॅटपेक्षा मोठा आणि बॅटच्या तळाजवळ असतो. दर्शिल शहा यांच्या मते बांबूपासून तयार केलल्या बॅटने यॉर्कर चेंडूवर सहजरित्या चौकार मारता येतो. याचबरोबर इतरही अनेक फटके मारताना मजा येते.

पण, एमसीसीने खेळातील बॅट आणि बॉलमधला समतोल पाहूनच या बॅटबद्दल निर्णय घेण्यात यावा असे मत व्यक्त केले. एमसीसीने आपल्या अधिकृत वक्तव्यात ‘नियमांचे पालनकरते या नात्याने एमसीसीची बॅट आणि बॉलमधील समतोल कायम राखणे ही प्रमुख भुमिका आहे. त्यामुळे कायद्यात कोणताही बदल करताना या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. विशेषकरून ताकदवर बॅटच्या संकल्पनेबाबत याचा गांभीर्याने विचार केला जाईल.’ असे स्पष्ट केले.

एमसीसीने बांबूच्या बॅटबाबत अनेक मद्दे उपस्थित केले असले तरी बॅटच्या टिकाऊपणाबाबत एमसीसी नियम तयार करणाऱ्या उप समितीच्या बैठकीत या अनुशंगाने चर्चा करणार आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत