कोरोना संकटात नवा धोका; हंता विषाणूच्या एन्ट्रीनं वाढवली चिंता, आरोग्य विभाग सतर्क

कोरोना संकटात नवा धोका; हंता विषाणूच्या एन्ट्रीनं वाढवली चिंता, आरोग्य विभाग सतर्क

मिशिगन: अमेरिका अजूनही कोरोना संकटातून पूर्णपणे बाहेर आलेली नाही. कोरोना विषाणूचा कहर अनुभवणाऱ्या अमेरिकेत आता नव्या विषाणूची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका महिलेला हंता विषाणूची लागण झाली आहे. तिच्यात हंता विषाणूची लक्षणं आढळून आली आहेत. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे.

स्थानिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती गंभीर असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिशिगन राज्यातील वाशटेनॉ काऊंटीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. हंता विषाणूची लागण झालेली महिला दोन वर्षांपासून बंद असलेल्या एका घराची साफसफाई करत होती. त्याचवेळी ती उंदरांच्या संपर्कात आली. त्यानंतर तिच्यात हंता विषाणूची लक्षणं दिसू लागली.

हंता विषाणू उंदरांकडून पसरतो. उंदरांची लाळ, लघवी आणि मल यांच्यामुळे हंता विषाणूची लागण होते. हंता विषाणूची लागण होण्याची अमेरिकेतील ही पहिलीच घटना नाही. अमेरिकेत १९९३ पासून हंता विषाणूबद्दल संशोधन सुरू आहे. अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. मात्र कोरोना संकटात हंताची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. हंताची लागण झालेल्यांपैकी ४० टक्के लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हंता विषाणू चिंतेचा विषय आहे.

कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधून जगभरात पसरला. चीननंतर युरोप, अमेरिका आणि भारताला याचा मोठा फटका बसला. चीनमधील कोरोनाचं संकट इतर देशांच्या तुलनेत लवकर नियंत्रणात आलं. मात्र त्यानंतर तिथे हंता विषाणू पसरला. त्यामुळे काही दिवस देशात घबराट पसरली. हंता विषाणूमुळे चीनमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे हंता विषाणू माणसांमधून माणसांमध्ये पसरत नाही. त्याची लागण केवळ उंदिर, खारींच्या संपर्कात आल्यावरच होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत