काँग्रेसचे ‘सेक्युलॅरिझम’: मंदिरांचे स्पीकर हटवले, मशिदींवरील भोंगे जैसे थे

काँग्रेसचे ‘सेक्युलॅरिझम’: मंदिरांचे स्पीकर हटवले, मशिदींवरील भोंगे जैसे थे

काँग्रेसच्या अजब सेक्युलॅरिझमचा एक नवा प्रकार समोर आला आहे. जिथे मंदिरांवरचे लाऊडस्पीकर हटविण्यात आले असून मशिदीवरील भोंगे मात्र बिनदिक्कत सुरू आहेत. काँग्रेसशासित राजस्थानमध्ये हा प्रकार घडला असून या विरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. सांगानेर येथील स्थानिक भाजपा आमदाराने या विरोधात आवाज उठवला आहे.

देशात एकीकडे कोविडचा हाहाकार सुरूअसताना या महामारीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. देशातील विविध भागात लॉकडाऊन लावण्यात आला असून या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन कार्यरत आहे. पण लॉकडाऊनच्या नावाखाली अनेक प्रकारचा गैरकारभार प्रशासनाकडून सुरु असल्याचीही उदाहरणे समोर येत आहेत. असाच एक प्रकार राजस्थानमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पक्षपात करत फक्त हिंदू प्रार्थनास्थळावर कारवाईचा बडगा उगारण्याचा अजब प्रकार राजस्थानमध्ये दिसून आला.

राजस्थानमधील सांगानेर भागातील भांकरोटा परिसरात अनेक प्राचीन हिंदू मंदिरे आहेत. या सार्‍या मंदिरांमध्ये सर्व रितीभाती पाळून धार्मिक पद्धतीने पूजा, आरती केली जाते. गेली अनेक वर्ष ही परंपरा सुरु आहे. पण लॉकडाऊनचे कारण पुढे करत स्थानिक पोलिस प्रशासनाकडून या मंदिरांवरील लाऊडस्पीकर जबरदस्ती हटवण्यात आले आहेत. पण त्याच वेळी या क्षेत्रातील मशीदींवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मशिदींवरचे भोंगे हटविण्यात आले नाहीतच, उलट नियमितपणे दिवसातून पाच वेळा या भोंग्यांचा वापर होताना दिसत आहे.

सांगानेर विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि जयपूरचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी या विषयावर प्रकाश टाकला असून त्यांनी यासंबंधी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. तर हे पत्र ट्विट करत त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. या साऱ्या प्रकारामुळे काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा चेहरा पुन्हा एकदा समोर आल्याचे म्हटले जात आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत