करोनानंतर ‘म्युकॉरमायकोसिस’ची वाढती भीती! कोणाला होतो हा आजार? जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती

करोनानंतर ‘म्युकॉरमायकोसिस’ची वाढती भीती! कोणाला होतो हा आजार? जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती

 ‘म्युकॉरमायकोसिस’ या आजाराचे रुग्ण गेल्या महिन्यांत आढळून आले. वैद्यकीय शास्त्राला पूर्वीपासून ज्ञात असलेला हा आजार ‘ब्लॅक फंगस’ किंवा ‘काळी बुरशी’ या नावानं ओळखला जातो. आजपर्यंत तसा दुर्मिळ असा हा विकार सर्वसामान्य जनतेला परिचित नसल्यानं त्याबाबत अकारण भय निर्माण झालं आहे.

करोनानंतर ‘म्युकॉरमायकोसिस’ची वाढती भीती! कोणाला होतो हा आजार? जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती

हायलाइट्स:

  • म्युकॉरमायकोसिसची लक्षणे
  • डोकेदुखी
  • ताप येऊ शकतो
  • गालांच्या हाडांवर सूज येणे

– डॉ. अविनाश भोंडवे
करोना विषाणूनं बाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यानंतरही हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामध्येच ‘म्युकॉरमायकोसिस’ या आजाराचे अनेक रुग्ण गेल्या महिन्यांत आढळून आले. वैद्यकीय शास्त्राला पूर्वीपासून ज्ञात असलेला हा आजार ‘ब्लॅक फंगस’ किंवा ‘काळी बुरशी’ या नावानं ओळखला जातो. आजपर्यंत तसा दुर्मिळ असा हा विकार सर्वसामान्य जनतेला परिचित नसल्यानं त्याबाबत एक सर्वव्यापी उत्सुकता आणि अकारण भय निर्माण झालं आहे.

अनिर्बंधपणे अज्ञान आणि भय पसरवणाऱ्या सोशल मीडियामध्ये हा एक नवा आजार सुरू झाला असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे याबाबत काही मूलभूत शास्त्रीय माहिती जाणून घेणं आवश्यक ठरतं. जगाच्या पाठीवर डोळ्यांनी न दिसणारे अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात. विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्टेरिया) यांच्या प्रमाणेच बुरशी (फंगस/ मोल्ड्स) हेही सूक्ष्म जीवजंतूंमध्ये येतात. विषाणू आणि जिवाणूंप्रमाणेच बुरशीच्याही असंख्य जाती आणि प्रजाती असतात. ‘म्युकॉरमायकोसिस’ हा बुरशीजन्य गंभीर आजार असून, ‘म्युकॉरमायसेटीस’ या गटातल्या बुरशीजन्य सूक्ष्मजंतूंमुळे होतो.

कुणाला होतो हा आजार?
सध्या जे रुग्ण दिसून येत आहेत, त्यात आधीपासून मधुमेह असलेल्या करोनाबाधित व्यक्तींना त्यांच्या आजाराच्या गांभीर्यावर मत करण्यासाठी उपचारादरम्यान स्टीरॉइड्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला असेल, तर काही रुग्णात ‘म्युकॉरमायकोसिस’ उद्भवत असल्याचं दिसून येतं. जानेवारी २०२० पासून आजपावेतो महाराष्ट्रात २००, गुजरातमध्ये १००, दिल्लीमध्ये १०० रुग्णांना ‘म्युकॉरमायकोसिस’ झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, प्रत्येक करोनाबाधित व्यक्तीला हा होत नाही; तसंच प्रत्येक करोनाबाधित मधुमेही व्यक्तींना स्टीरॉइड्स दिलेले असले, तरी होत नाही. कोणत्याही कारणानं ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशा व्यक्तींना हा बुरशीजन्य जंतूंचा संसर्ग होतो. मधुमेहासारख्या आजारांमध्ये रुग्णाची प्रतिकारप्रणाली आधीपासूनच मंदावलेली असते. त्यात करोनाबाधित झाल्यावर विषाणूंच्या संसर्गामुळे त्या प्रतिकारप्रणालीवर ताण येतो. या रुग्णांची प्रतिकारप्रणाली स्टीरॉइड्समुळे आणखी दबली जाते. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन हे बुरशीजन्य जंतू संधी साधतात आणि रुग्णाला ‘म्युकॉरमायकोसिस’ होतो.

काय आहेत लक्षणं?
तसं पाहता ‘म्युकॉरमायकोसिस’चे सहा प्रकार आहेत. नाकामधून मेंदूकडे जाणारा, ‘ऱ्हायनोसेरेब्रल’ हा प्रकार सर्वांत जास्त आढळतो. सध्या याच प्रकारातले रुग्ण जास्त आहेत. यात रुग्णाला चेहऱ्याच्या एका बाजूला, गालांच्या हाडांवर सूज येते, डोकं कमालीचं दुखतं, नाक चोंदल्यासारखं वाटून नाकानं श्वास घ्यायला त्रास होतो, ताप येऊ लागतो. काही वेळेस सुरुवातीला रुग्णांच्या नाकाच्या वरच्या बाजूवर कपाळाखाली किंवा तोंडामध्ये टाळ्यावर काळे व्रण दिसून येतात आणि आजार लगेच गंभीर स्वरूप धारण करतो. ‘म्युकॉरमायकोसिस’चे फुफ्फुसांमध्ये, पोटामध्ये, त्वचेवर, आणि रक्ताभिसरणातून सर्व शरीरभर पसरणारेही प्रकार आहेत.

कसा होतो संसर्ग?
भारतात आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांच्या निरीक्षणामधून या आजाराचा संसर्ग दोन प्रकारे होत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.https://ed5de7d18ead5fe10d924f9f95cc57c6.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

१. हॉस्पिटलमधून – करोनाचा रुग्ण इस्पितळात दाखल झाल्यावर त्याला ऑक्सिजन लावला जातो. सिलिंडरमधून येणारा ऑक्सिजन हा अतिशय कोरडा असतो, तो फुफ्फुसांना आणि श्वासमार्गाच्या आत असलेल्या पातळ अस्तराला इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे तो एका पाण्याने भरलेल्या नळीतून बुडबुड्याच्या स्वरूपात आर्द्र केला जातो. या पाण्याच्या नळीला ‘ह्युमिडीफायर’ म्हणतात. यात खरं तर जंतुविरहित असलेले ‘डिस्टील्ड वॉटर’ भरणं आवश्यक असतं; पण क्वचित काही ठिकाणी कामाच्या दबडघ्यात कर्मचाऱ्यांकडून त्यात नळाचं साधं पाणी भरलं जात असावं आणि ते पाणी वरचेवर बदललं जात नसावं; त्यामुळे त्यातून बुरशीजन्य जंतू रुग्णाच्या नाकात प्रविष्ट होत असावेत, असा तज्ज्ञांचा कयास आहे. हॉस्पिटलमधील एअरकंडीशनर्सचे डक्ट्स वेळोवेळी स्वच्छ आणि निर्जंतुक न केल्यास त्यातूनही ‘म्युकॉरमायकोसिस’च्या जंतूंचा प्रादुर्भाव होत असावा असाही अंदाज आहे. मात्र, कोव्हिडच्या काळातही रुग्णालयातील, त्यातील आयसीयूमधील निर्जंतुकतेबाबत असलेली मार्गदर्शक तत्त्वं सर्व रुग्णालयं कटाक्षानं पाळत असल्यानं हा संसर्ग या पद्धतीने क्वचितच होत असावा.

२. रुग्णांच्या घरातून – करोनाचा रूग्ण इस्पितळातून घरी आणल्यावर त्याला घरातील एसी, पडदे, गालिचे किंवा दमट भिंतीमधूनही हा प्रादूर्भाव होऊ शकतो.

निदानोपचार
करोनापश्चात रुग्णाची लक्षणं पाहूनच डॉक्टरांना या आजाराची कल्पना येते. त्यानंतर त्याच्या रक्ताच्या तपासण्या, आजार असलेल्या भागाचे सिटीस्कॅन/ एमआरआय केले जातात. ‘म्युकॉरमायकोसिस’मुळे नाकात निर्माण होणाऱ्या द्रावाची किंवा राखाडी रंगाच्या पापुद्र्याची शक्य असल्यास सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्या केल्या जातात आणि निदान पक्कं केलं जातं. रुग्णाला अ‍ॅम्फोटेरीसिन-बी हे इंजेक्शन शिरेतून दिलं जातं.

स्कॅनवरील निदानाप्रमाणे या आजारानं व्याप्त असलेल्या नाकाच्या हाडांची, सायनसेसची आणि डोळ्याची शस्त्रक्रिया करून अंतर्गत भागात निर्माण झालेली बुरशी साफ केली जाते. आजार जास्त पसरलेला असल्यास आणि हाडांमध्ये गेला असल्यास ती हाडं शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकली जातात. डोळ्याच्या बाबतीतही आजार डोळ्यामध्ये पसरला आहे असे दिसल्यास डोळाही खोबणीतून काढला जातो. या रुग्णावर नाक-कान-घशाच्या आणि डोळ्याच्या विशेषज्ञ डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया आणि उपचार करते.

बहुतेकदा एकापेक्षा जास्तवेळा शस्त्रक्रिया करावी लागते. जर रुग्णाला उपचारासाठी वेळेवर रुग्णालयात न आणल्यास हा आजार वाढून मेंदूमध्ये तसेच शरीरात अन्यत्र पसरू शकतो. कोणताही आजार काही पाऊलखुणा सोडून जात असतो. तशा पद्धतीचाच हा आजार आहे. एकूण बाधित व्यक्तींच्या प्रमाणाकडे पाहिल्यास त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. करोना पूर्ण बरा होतो; पण त्यानंतर काही विकार उद्भवू शकतात; त्यामुळे ‘आता माझा आजार संपला. मी बरा झालो,’ अशा भ्रमात राहू नये.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत