आयपीएलचे उर्वरित ३१ सामने भारतात होणार नाहीत – गांगुली

आयपीएलचे उर्वरित ३१ सामने भारतात होणार नाहीत – गांगुली

सामने खेळण्याआधी १४ दिवस क्वारंटाईन होणे खेळाडूंसाठी कठीण होत आहे. या दरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे देशातील अनेक लोक आयुष्याशी झुंज देत असून, क्रिकेटपटूदेखील याला अपवाद नाहीत.

नवी दिल्ली : आयपीएल-१४ मधील उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन कधी आणि कुठे होईल, याबाबत संभ्रम कायम आहे. आयोजनासंदर्भात बोर्डाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यादरम्यान सामन्यांचे आयोजन भारतात मात्र होणार नसल्याचे स्पष्टीकरण अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोमवारी दिले.

ते म्हणाले,‘‘आयपीएलचे उर्वरित सामने यंदा भारतात होणार नाहीत, हे स्पष्ट आहे; मात्र या सामन्यांचे आयोजन कुठे करायचे, याचा निर्णयदेखील आम्ही घेतलेला नाही. सामन्यांच्या आयोजन स्थळाबाबत वक्तव्य करणे घाईचे ठरेल. यंदाच्या पर्वातील ६० पैकी २९ सामने यशस्वीपणे पार पडले. कोरोनामुळे उर्वरित सामने स्थगित करण्यात आले आहेत. ३१ सामन्यांचे आयोजन न झाल्यास बोर्डाला २५०० कोटींचे नुकसान सोसावे लागेल.’’

सामने खेळण्याआधी १४ दिवस क्वारंटाईन होणे खेळाडूंसाठी कठीण होत आहे. या दरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे देशातील अनेक लोक आयुष्याशी झुंज देत असून, क्रिकेटपटूदेखील याला अपवाद नाहीत. मागच्या पर्वात यूएईत सामने आयोजनाचे अवघड आव्हान बोर्डापुढे होते; मात्र आम्ही आयोजनात यशस्वी ठरलो. यंदा कोरोनाच्या थैमानामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अशावेळी क्रिकेटचे आयोजन किती कठीण आहे, हे आपण समजू शकता,असेही गांगुली यांनी सांगितले.

‘आम्ही मागच्या वर्षभरापासून कोरोना संकटाशी सामना करीत आहोत. डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ असा हा संघर्ष होता. मार्चमध्ये स्थितीत सुधारणा झाल्यामुळे देशात आयपीएल आयोजन करण्याच्या आशा उंचावल्या होत्या; मात्र एप्रिलमध्ये पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावे लागले. सद्यस्थितीत श्रीलंका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि यूएई येथे ३१ सामन्यांच्या आयोजनाचा प्रस्ताव बोर्डाच्या विचाराधिन असून, योग्यवेळी यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही गांगली यांनी दिली

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत