आता विनाकारण बाहेर फिरणं पडणार महागात, बघा काय आहे बातमी

आता विनाकारण बाहेर फिरणं पडणार महागात, बघा काय आहे बातमी

नगर : कोरोना संचारबंदी असूनही नागरिक विनाकारण बाहेर फिरताना, वॉक करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची आता रस्त्यावरच ‘अँटीजेन टेस्ट’करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच प्रशासनानेही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली.

antijan1

जनतेच्या हितासाठीच ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी काही कारण नसताना घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता काही उपाययोजनांसाठी महापौर वाकळे यांनी सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच‘अँटिजेन टेस्ट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर,  मालन ढोणे, रोहिणी शेंडगे, सुप्रिया जाधव, संजय ढोणे, अजय चितळे, सतीश शिंदे, सचिन जाधव, अनिल बोरूडे आदी सदस्य तिथे उपस्थित होते.

रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांसाठी बेड उपलब्ध नाहीत. तसेच प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावे, लक्षणे दिसत नसली तरी तूर्तास जाऊन चाचणी करून घ्यावी, सकारात्मक अहवाल असणाऱ्या रुग्णांनी लगेच ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल व्हावे, असे आवाहन महापौर वाकळे यांनी केले.

सभापती अविनाश घुले यांनी सांगितले, की मनपाने कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा व औषधोपचार वेळेत मिळण्यासाठी नियोजन करावे. विरोधीपक्ष नेते बारस्कर यांनी, मनपाच्या वतीने प्राणवायूचा प्रकल्प, रुग्णालय उभारण्याची तर अजय चितळे यांनी मनपाच्या कोविड सेंटरमध्ये प्राणवायूची सुविधा असणाऱ्या खाटा उपलब्ध करण्याची मागणी केली.

नगरसेविका अश्विनी जाधव यांनी सर्व नगरसेवकांना त्यांचा निधी रोख स्वरूपात करून द्यावा, या निधीतून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री व औषधे घ्यावीत, त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळेल, या मागणीचे पत्र महापौर व आयुक्तांना दिले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत