अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विदयार्थ्यांची कसरत

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विदयार्थ्यांची कसरत

महाराष्ट्र – महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री मंडळांनी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यात वाढलेल्या दबावापुढे नमते घेत राज्यातील दहावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मात्र हा निर्णय घेताना पहिलीपासून परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करायचे, हा प्रश्न अजून समोर असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षेच्या आधारे करण्याबाबत शिक्षण विभाग तपासणी करत आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) इतर केंद्रीय शिक्षण मंडळे, आंतरराष्ट्रीय मंडळे यांनी दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्याबाबत शासनावर दबाव वाढला आहे. त्यानंतरही ‘परीक्षेची तयारी झाली असून परीक्षा होणारच’, या भूमिकेवर ठाम असलेल्या राज्य मंडळाला न जुमानता राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बारावीच्या परीक्षा मात्र घेण्यात येणार आहे असेही त्यांनी ह्या बैठकीत म्हंटले आहे.

राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल अखेरीस घेण्याचे नियोजन राज्य मंडळाने केले होते. मात्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानंतर विविध संघटना, आमदार यांच्याकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार या परीक्षा मे च्या अखेरीस घेण्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. मात्र त्यानंतर केंद्रीय मंडळांनी परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राज्य मंडळाच्याही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यात होऊ लागली.

केंद्रीय मंडळांप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळालेल्या निकालावर आक्षेप असतील त्यांच्यासाठीही पर्याय देण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

राज्यात पहिली ते आठवीच्या परीक्षा होत नाहीत. विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्यात येतो. सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे अपेक्षित असले तरी ते योग्य प्रकारे होते का, याची काटेकोर पडताळणीही होत नसल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. त्यानंतर नववी ही शाळास्तरावरील परीक्षा आणि दहावी ही एकमेव बाह््यमूल्यमापन होणारी परीक्षा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शालेय शिक्षणाच्या प्रवासात होते. यंदा दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या वर्षी नववीची परीक्षाही कोरोनामुळे रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांना सरसकट दहावीच्या वर्गात ढकलण्यात आले.

दहावीच्या गुणांच्या आधारे राज्यातील अकरावी, तंत्रशिक्षण पदविका, आयटीआय यांसह विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतात. दरवर्षी राज्य मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणारे साधारण १४ लाख विद्यार्थी आणि इतर मंडळाचे विद्यार्थी अशी जवळपास १६ ते १७ लाख विद्यार्थी या प्रक्रियेत असतात. यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रणालीच्या माध्यमातून होते. त्यात नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अध्र्या गुणांवरूनही चढाओढ होते.

यंदा राज्यातील अनेक भागांतील शाळांमध्ये ऑनलाइन वर्गांचा वर्षभर बोजवारा उडाला होता. अनेक शाळा वर्षभरात विद्यार्थ्यांच्या परीक्षाच घेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांची अंतर्गत मूल्यांकनाची ठोस प्रणाली गेल्या अनेक वर्षांपासून वापरात आहे. मात्र राज्यात अशी कोणतीही व्यवस्था नाही.

राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व मंडळांच्या निर्णयात एकसमानता असावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत